![]()
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी रविवारी दादरच्या शिवाजी पार्कवर झालेल्या आंदोलनाप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांच्या धरपकडीला विरोध करत आंदोलनात उडी घेणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसताना बेकायदा जमाव जमवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नेमकं काय घडलं? रविवारी (११ ऑक्टोबर) सीजेपी (CJP) या संघटनेने निवडणूक आयोगाच्याविरोधात आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्कात आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरीही मोठ्या संख्येने तरुण-तरुणी शिवाजी पार्कात जमल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांच्यासह सुमारे ३०० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आदित्य, अमित आणि तेजस ठाकरे मैदानात शांततापूर्ण मार्गाने चाललेल्या या आंदोलनावरील पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच अमित ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांची धरपकड थांबवावी आणि ताब्यात घेतलेल्यांची सुटका करावी, या मागणीसाठी या नेत्यांनी थेट रस्त्यावर आणि शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी गाडीच्या टपावर चढून कार्यकर्त्यांना संबोधित करत पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध केला होता. “भारतीय जनता पक्ष आणि सरकार घाबरले आहे, त्यामुळेच देशभक्तांना रस्त्यावरून अटक केली जात आहे,” असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला होता. बेकायदा जमाव जमवल्याचा ठपका ठाकरे बंधूंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आणि पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमवून दिलेल्या इशाऱ्यामुळे रविवारी रात्री उशिरा सर्व आंदोलकांना सोडण्यात आले. मात्र, या प्रकरणी आता पोलिसांनी कायदेशीर पाऊल उचलले आहे. परवानगी नसताना आंदोलन करणे आणि बेकायदा जमाव जमवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना आणि मनसेकडून यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. —————— हेही वाचा.. दोन महिन्यांत ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होणार:11 दिवसांच्या संघर्षानंतर रोहित पवार म्हणाले- हा विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा विजय “विजय विद्यार्थी एकजुटीचा… विजय विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा… आणि चिकाटीचा…” अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी सलग 11 दिवस पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या यशाचे स्वागत केले आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर आणि एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना रजेवर पाठवल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या यशानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, या यशात साथ देणाऱ्या सरकार आणि प्रशासनाचेही आभार मानले आहेत. सविस्तर वाचा
Source link
ठाकरे बंधूंच्या अडचणी वाढल्या!:शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?