![]()
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ठाणे-पालघर विधान परिषद मतदारसंघासाठी एक नवे समीकरण आकाराला येण्याची चिन्हे दिसून येत आहेत. विरार, वसई, नालासोपारा आणि पालघर पट्ट्यात मजबूत पकड असलेल्या बहुजन विकास आघाडीचे (बविआ) नेते क्षितीज ठाकूर यांना या जागेवरून संधी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. आगामी काळात पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी आणि निवडणुकांमध्ये मतांची गोळाबेरीज वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून बहुजन विकास आघाडीला थेट शिवसेनेत सामावून घेण्यासाठी शिंदेंकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या ‘बविआ’ची वसई-विरार आणि पालघर भागात मोठी व्होट बँक आहे. हे विलीनीकरण प्रत्यक्षात आल्यास शिवसेनेची या पट्ट्यातील ताकद कमालीची वाढणार आहे. फाटकांच्या उमेदवारीवर टांगती तलवार शिवसेना आणि ‘बविआ’च्या या संभाव्य हातमिळवणीमुळे शिंदेसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. रवींद्र फाटक हे स्वतः या जागेसाठी प्रबळ इच्छुक असून त्यांनी मतदारसंघाची मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणांमुळे त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. 2024 मध्ये क्षितीज ठाकुरांचा भाजपने केला पराभव क्षितीज ठाकूर यांना उमेदवारी देण्याच्या या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण 2024 च्या विधानसभा निवडणुकीत क्षितीज ठाकूर यांना भाजप उमेदवाराकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. या पराभवानंतर आता थेट विधान परिषदेच्या माध्यमातून क्षितीज ठाकूर यांचे पुनरागमन घडवून आणण्याची रणनीती शिंदे गटाकडून आखली जात असल्याचे दिसते. या धक्कातंत्रामुळे निष्ठावंत नेत्यांना डावलून विरोधकांना सोबत घेण्याच्या शिंदेंच्या या नव्या समीकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपचे संख्याबळ जास्त, पण बविआकडे निर्णायक मते ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची आकडेवारी पाहता, एकट्या भाजपकडे तब्बल 444 मतांचे मोठे संख्याबळ आहे. त्याखालोखाल शिवसेनेकडे (शिंदे गट) 346 मते आहेत. या सांख्यिकीय समीकरणात भाजप सध्या शिवसेनेपेक्षा वरचढ ठरत आहे. त्यामुळे या जागेवर दावा मजबूत करण्यासाठी किंवा स्वतःचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अतिरिक्त मतांची गोळाबेरीज करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. बहुजन विकास आघाडीची (बविआ) 71 मते येथे निर्णायक ठरणार आहेत.
Source link
ठाण्यात बहुजन विकास आघाडी शिंदेंसोबत?:क्षितिज ठाकूर विधान परिषदेवर जाण्याची चर्चा; पालघर पट्ट्यात शिंदेंची ताकद वाढणार