Headlines

हिंगोलीत शालेय पोषण आहाराचा बोजवारा:शाळांमध्ये किडलेले वाटाणे अन् सडक्या डाळी, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात




हिंगोली जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या भोजनाचे धान्य निकृष्ठ असल्याने 1038 शाळांमधून 1.15 लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. किडलेले वाटाणे, तांदूळात किडे अन आळ्या, डाळी खराब झालेल्या त्यामुळे हा पोषण आहार आहे का कुपोषण आहार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी मात्र शाळेची नांवे सांगा आम्ही तपासणी करतो असे स्पष्ट केले. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तसेच खाजगी अनुदानीत अशा एकूण 1038 शाळांमधून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिल्या जातो. यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या 69 हजार 419 तर इयत्ता सहावी ते आठवीच्या 46 हजार 579 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पोषण आहार शिजवून देण्याचे काम बचत गटाकडे देण्यात आले आहे. दरम्यान, शाळांना शासनस्तरावरूनच धान्याचा पुरवठा केला जातो. यामध्ये तांदूळ, मुगडाळ, मसूरडाळ, हरभरा, वाटाणा, चवळी, सोयाबीन वडी, मटकी आदी धान्याची साहित्याचा तसेच तेल, मीठ, मोहरी, तिखट या मसाले पदार्थांचा समावेश आहे. तर भाजीपाला आणण्याचे काम शाळास्तरावर केले जाते. त्यामुळे प्रत्येक शाळेत पोषण आहाराची जबाबदारी एका शिक्षकावर सोपविण्यात आली आहे. दरम्यान, शासनाकडून उन्हाळ्यामध्ये धान्याचा पुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर हेच धान्य आता पोषण आहारासाठी वापरले जात आहे. शाळेत धान्य साठविण्यासाठी पुरेशी जागा नाही, कोठ्या नाहीत त्यामुळे धान्याचे पोते पडून आहेत. मुळातच शासनाकडून पुरवठा झालेले धान्य निकृष्ठ दर्जाचे असतांनाही शाळा प्रशासनाकडून नाईलाजास्तव याच धान्याचा पोषण आहार शिजवून विद्यार्थ्यांना द्यावा लागत आहे. विशेष म्हणजे धान्याचा पुरवठा झाल्यानंतर त्याची अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी केली जात नाही. त्यामुळे खराब झालेल्या धान्याचाचा पोषण आहार दिला जात असल्याने हा पोषण आहार कि कुपोषण आहार असा प्रश्‍न पालकांतून उपस्थित केला जात आहे. निकृष्ठ धान्य शिजवून पोषण आहार दिल्या जात असल्याने 1.15 लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे आता अन्न व औषध प्रशासनासोबत शिक्षण विभागाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. शाळेमध्ये दर दिवशी असतो वेगळा मेन्यू महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या आठवड्यात सोमवारी व्हिजीटेबल पुलाव. मंगळवारी मुगडाळ खिचडी. बुधवारी चना पुलाव. गुरुवारी चवळी खिचडी. शुक्रवारी सोयाबीन पुलाव. शनिवारी मुग शेवग्याचे वरण भात. तसेच दुसऱ्या व चौथ्या आठवड्यात सोमवारी मसाले भात. मंगळवारी मसुरी पुलाव. बुधवारी मुग शेवग्याचे वरण. गुरुवारी सोयाबीन पुलाव. शुक्रवारी मटकी उसळ. शनिवारी मटर पुलाव. तुम्ही शाळेची नांवे पाठवा आम्ही तपासणी करतो- काळे प्रभारी शिक्षणाधिकारी आसावरी काळे म्हणाल्या की, हिंगोली जिल्ह्यात धान्य साठवणुकीचा प्रश्‍न आहे तो लवकरच सोडविला जाईल. मात्र धान्य कुठे खराब आहे त्या शाळेची नांवे सांगा आम्ही तेथे पथक पाठवून तपासणी करतो. लवकरच नमुने तपासणीसाठी घेणार- तुषार घोपे हिंगोली अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घोपे म्हणाले की, हिंगोली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाकडून युध्दपातळीवर कारवाईची मोहिम सुरु आहे. आता पुढील काळात सर्वच शाळांतील पोषण आहाराच्या धान्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *