Headlines

डॉ. स्वाती मुजुमदार सिम्बायोसिस विद्यापीठाच्या कुलपतीपदी:चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गौरव, ग्रामीण कौशल्य शिक्षणाचे आवाहन




पुणे येथे सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या कुलपतीपदी डॉ. स्वाती मुजुमदार यांच्या नियुक्तीनिमित्त गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते डॉ. मुजुमदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सिम्बायोसिसचे अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार आणि संजीवनी मुजुमदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अशा संस्थांना शासनाकडून आवश्यक सुविधा आणि प्रोत्साहनपर योजना उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, महाराष्ट्राला कौशल्य विकास व प्रशिक्षणात अग्रेसर बनवण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न सिम्बायोसिस आणि मुजुमदार परिवाराने पूर्ण केले आहे. भविष्यात सिम्बायोसिस कौशल्य व व्यावसायिक शिक्षण विद्यापीठ हे जगातील कौशल्य विकासाचे महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिम्बायोसिसचे अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी सध्याच्या शिक्षण पद्धतीवर भाष्य केले. इंग्रजांनी सुरू केलेली शिक्षण पद्धती आजही भारतात सुरू असून, सध्याच्या काळात कौशल्य विकासाचे महत्त्व लक्षात घेऊन सिम्बायोसिसने स्वतंत्र कौशल्य विद्यापीठाची स्थापना केली आहे. कौशल्य विकास व प्रशिक्षण क्षेत्रात भारताने अग्रेसर राहावे यासाठी केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. स्वाती मुजुमदार यांनी सांगितले की, गतिमान व प्रगतिशील राजकीय नेतृत्वामुळे मोठ्या गोष्टी साध्य करणे शक्य होते आणि सिम्बायोसिस कौशल्य विकास व व्यवसाय प्रशिक्षण विद्यापीठ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या विद्यापीठाच्या उभारणीत तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठातील अभ्यासक्रम उद्योगांच्या मनुष्यबळाच्या गरजा लक्षात घेऊन तयार केला जातो. केवळ प्राध्यापक आणि शिक्षण तज्ञच नव्हे, तर उद्योग क्षेत्रातील मान्यवरही अभ्यासक्रम निश्चित करण्यात सहभागी असतात. विद्यापीठाने 200 हून अधिक प्रमुख उद्योगांशी सहकार्य करार केले आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण आणि करिअर घडवण्याच्या संधी मिळत आहेत, असेही डॉ. स्वाती मुजुमदार यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *