![]()
विप्रोच्या ‘एलिट भरती २०२५’ प्रक्रियेत निवड झालेल्या २०० हून अधिक विद्यार्थी आणि तरुण अभियंत्यांचा सेवेत समावेश रखडल्याने ‘नॅसंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट’ (NITES) या संघटनेने भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे औपचारिक तक्रार
.
या प्रकरणात मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करून प्रभावित उमेदवारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ‘नाइट्स’ने केली आहे.
‘नाइट्स’ने दिलेल्या माहितीनुसार, या उमेदवारांनी विप्रोची संपूर्ण भरती प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. त्यांना कंपनीकडून नियुक्तीपत्रे आणि नियुक्तीच्या आशयाची पत्रे मिळाली होती. उमेदवारांनी ती स्वीकारल्यानंतर आवश्यक मूल्यांकन चाचण्या आणि पार्श्वभूमी पडताळणी प्रक्रियाही पूर्ण केली.
मात्र, अनेक महिने उलटूनही त्यांना सेवेत रुजू होण्याची निश्चित तारीख किंवा कंपनीकडून समाधानकारक माहिती मिळालेली नाही.
या विलंबामुळे विद्यार्थ्यांना गंभीर आर्थिक, व्यावसायिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेने तक्रारीत म्हटले आहे. अनेक उमेदवारांनी विप्रोमधील नोकरीवर विश्वास ठेवून आपल्या करिअरचे नियोजन केले होते. काहींनी या नोकरीच्या अपेक्षेने इतर रोजगाराच्या संधीही नाकारल्या होत्या. यामुळे त्यांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
मंत्रालयाने विप्रोकडून उमेदवारांची सद्यस्थिती, सेवेत समावेशाला झालेल्या विलंबाची कारणे, निवड प्रक्रिया आणि नियुक्तीच्या आशयाच्या पत्रांची वैधता याबाबत स्पष्ट माहिती मागवावी, अशी मागणी ‘नाइट्स’ने केली आहे. तसेच, पात्र उमेदवारांसाठी निश्चित आणि वेळबद्ध सेवेत समावेशाचे वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश कंपनीला द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
‘नियुक्तीपत्र हे तरुण अभियंत्यांच्या करिअरची सुरुवात असायला हवे; अनिश्चित काळाच्या प्रतीक्षेची नव्हे,’ असे ‘नाइट्स’चे अध्यक्ष अॅड. हरप्रीत सिंग सलुजा यांनी म्हटले आहे.