Headlines

ढगांची हुलकावणी; पिकांची करपणी!:सोयाबीन, मूग, उडीद धोक्यात, कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची मागणी‎




जामखेड तालुक्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. जूनअखेरीस आणि जुलै महिन्यात झालेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीन, मूग, उडिद यांसह विविध पिकांची पेरणी केली. सुरुवातीला काही दिवस रिमझिम पाऊस झाल्याने पिकांनी उभारी घेतली; मात्र त्यानंतर तब्बल महिनाभर पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागली आहेत. जामखेड तालुक्यातील सोयाबीनचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकत परिसरातील सोयाबीन पिकांवर पावसाअभावी मोठे संकट ओढवले आहे. अनेक शेतांमध्ये सोयाबीनची पिके सुकून गेली असून मूग व उडीद पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. महागडी बियाणे, खते, मशागत आणि पेरणीवर खर्च करून उभा केलेला खरीप हंगाम आता हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे तालुक्यातील ओढे, नदी-नाले, विहिरी आणि तलावांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्या असून तळ्यांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्यासोबतच काही भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या आकाशात मोठ्या प्रमाणात ढग दाटून येत असल्याने पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटते. मात्र काही वेळातच ढग निघून जातात आणि पावसाचा थेंबही पडत नसल्याने चिंता वाढली आहे. ‘आज येईल, उद्या येईल’ या आशेवर बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. आकाशात ढग मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग करून पिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी व नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना योग्य मदत द्यावी आणि संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महागाईच्या काळात उत्पादनासाठी मोठा खर्च करूनही पावसाअभावी पिके हातची जात असल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाने आणखी काही दिवस ओढ दिल्यास खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आभाळ भरून यावे आणि जोरदार पाऊस पडून शेतीला जीवदान मिळावे, यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पाऊस नाही, खर्च डोक्यावर! खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत आणि पेरणीवर मोठा खर्च केला आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने हा संपूर्ण खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामाची तयारी करणेही शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या कठीण ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *