Headlines

तळेगावात रस्त्यावर पाणी, रस्ता खचला:पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक चाचणीदरम्यान घडली घटना




तळेगाव दाभाडे येथील संभाजीनगर परिसरात मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर पाणी येऊन रस्ता खचल्याच्या घटनेनंतर तळेगाव नगर परिषदेने खुलासा केला आहे. ही घटना पाणीपुरवठा योजनेच्या नियोजित तांत्रिक चाचणीदरम्यान घडली, असे नगर परिषदेने स्पष्ट केले. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात पाण्याच्या टाक्या, मुख्य दाबनलिका आणि वितरण नलिका टाकण्याची कामे झाली आहेत. या योजनेतील संभाजीनगर येथील नव्याने बांधलेल्या पाण्याच्या टाकीच्या आउटलेट लाईनची तांत्रिक चाचणी रविवार, ४ जुलै २०२६ रोजी सुरू होती. या चाचणीवेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, तांत्रिक कर्मचारी, संबंधित कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सुमारे दीड वर्षांपूर्वी टाकलेली ही मुख्य पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन शहरातील मुख्य बाजारपेठेतील वर्दळीच्या रस्त्याखाली होती. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अंतिम चाचणीपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. चाचणी सुरू करण्यापूर्वी खबरदारी म्हणून संबंधित मार्गावरील वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली होती. टाकीतून पाणी सोडल्यानंतर पाण्याचा दाब अधिक असल्याने जमिनीखालून पाणी वर आले आणि रस्ता खचला. ही बाब निदर्शनास येताच तांत्रिक पथकाने तत्काळ मुख्य व्हॉल्व्ह बंद करून पाण्याचा प्रवाह थांबवला. त्यानंतर संबंधित ठिकाण तातडीने मोकळे करून पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी आवश्यक मोजमाप घेण्यात आले आहे. उर्वरित काम मंगळवारपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यावर संबंधित कंत्राटदारामार्फत रस्ता व परिसर पूर्ववत केला जाईल. तळेगाव नगर परिषदेने स्पष्ट केले आहे की, ही घटना कोणत्याही निकृष्ट कामामुळे किंवा अनपेक्षित दुर्घटनेमुळे घडलेली नसून, पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नियोजित तांत्रिक चाचणीदरम्यान घडलेली बाब आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *