Headlines

महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण:एसएनडीटीने स्त्री शिक्षणाची परंपरा समृद्ध केली – राज्यपाल जिष्णू देव वर्मा




भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेल्या स्त्री शिक्षणाच्या परंपरेला एसएनडीटी महिला विद्यापीठाने पुढे नेले आहे. शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रात विद्यापीठाने देशासाठी आदर्श कार्य केले आहे, असे महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांनी म्हटले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हे विद्यापीठ बहुविषयक शिक्षण, संशोधन, उद्योजकता आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे वाटचाल करत असून, देशातील अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता त्यात आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या १११ व्या स्थापना दिनानिमित्त कर्वे रस्ता येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच, ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’ चे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी, राज्यपालाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव आणि कुलसचिव प्रा. डॉ. विलास नांदवडेकर उपस्थित होते. याव्यतिरिक्त, व्यवस्थापन परिषद व शैक्षणिक परिषदेचे सदस्य, प्राध्यापक, माजी विद्यार्थीनी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राज्यपाल देव वर्मा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारतरत्न महर्षी कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य केवळ सामाजिक परिवर्तनाचे नव्हते, तर ते राष्ट्रनिर्मितीचे कार्य होते. स्त्री शिक्षणाद्वारे महिलांचे सक्षमीकरण हा विकसित भारताचा पाया आहे. विद्यापीठांनी केवळ अध्यापन केंद्र न राहता संशोधन, नवोपक्रम, समस्या निराकरण आणि राष्ट्रनिर्मितीची केंद्रे बनले पाहिजेत. त्यांनी विद्यार्थिनींना कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, हवामान बदल, आरोग्य, कृषी आणि सामाजिक उद्योजकता यांसारख्या क्षेत्रांत संशोधन व नवोपक्रमावर भर देण्याचे आवाहन केले. ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’ हे संशोधनाचे उद्योगांमध्ये, कल्पनांचे उपयुक्त उपायांमध्ये आणि तरुणांच्या संकल्पनांचे स्टार्टअपमध्ये रूपांतर घडवणारे प्रभावी व्यासपीठ आहे, असे राज्यपाल म्हणाले. विकसित भारत २०४७ साकार करण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील विकास अपरिहार्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली. एसएनडीटी महिला विद्यापीठ हे त्यांच्या विचारांचे संस्थात्मक रूप आहे. आज महिलांनी विज्ञान, संशोधन, संरक्षण, प्रशासन, उद्योग, विमान वाहतूक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशामागे शतकापूर्वी पेरलेल्या स्त्री शिक्षणाच्या बीजांचे मोठे योगदान आहे. विकसित भारताच्या निर्मितीत महिलांचे नेतृत्व निर्णायक ठरणार असून, या वाटचालीत एसएनडीटी महिला विद्यापीठाचे योगदान महत्त्वाचे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकात कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव यांनी महर्षी कर्वे यांचा पुतळा हा त्यांच्या विचारांचा आणि स्त्री सक्षमीकरणाच्या चिरंतन मूल्यांचा प्रेरणास्त्रोत असल्याचे सांगितले. ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’ मुळे उद्योग, शासन, स्टार्टअप, संशोधक आणि विद्यार्थिनींना एकत्र आणणारी सक्षम नवोपक्रम परिसंस्था निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला कार्यक्रमापूर्वी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या १११ व्या स्थापना दिनानिमित्त भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’चे उद्घाटन केले. यावेळी विद्यार्थिनींच्या नवोपक्रमातून साकारलेल्या विविध प्रकल्प, उत्पादने व संशोधनाधारित प्रदर्शनीची पाहणी करून राज्यपालांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला तसेच त्यांच्या कल्पकता, संशोधनवृत्ती आणि नवोपक्रमशीलतेचे विशेष कौतुक केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *