![]()
अंजनगाव सुर्जी तालुक्यात गेल्या एक-दोन आठवड्यांपासून पारा ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने संत्रा व लिंबू उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. प्रचंड उष्णतेमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, अनेक ठिकाणी झाडांवरील फळे गळून पडत आहेत आणि झाडेही वाळत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रहार युवक तालुकाध्यक्ष निलेश विनोद चोपडे यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. अंजनगाव सुर्जी तालुका हा संत्रा व लिंबू उत्पादनासाठी ओळखला जातो. विशेषतः, या तालुक्यात आंबिया बहरातील संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षी असह्य उष्णतेमुळे फळबागांवर विपरीत परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बागांमधील संत्र्यांची फळे अकाली गळून पडत असून, काही ठिकाणी झाडेही करपण्याच्या स्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून पंचनामे करावेत, तसेच प्रभावित शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती महसूल खात्याचे प्रमुख या नात्याने तहसीलदार तसेच कृषी विभागाचे प्रमुख या नात्याने तालुका कृषी अधिकारी भारती जाधव यांनाही देण्यात आल्या आहेत. निवेदन सादर करताना संत्रा व लिंबू उत्पादक योगेश डोबाळे, गोकुळ पडोळे, उमेश मंगळे, निखिल सपकाळ, आकाश गिते, भास्कर हुरबडे, कैलास गिते, सुनील जानोरकर आदी शेतकरी उपस्थित होते. सतत वाढत असलेल्या तापमानामुळे फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून, उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नव्या संकटाची भर पडली आहे. फळबागांच्या देखभालीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
Source link
तापमान वाढीमुळे संत्रा, लिंबू उत्पादक शेतकरी संकटात:तातडीने पंचनामा करून आर्थिक मदतीची मागणी, कृषी अधिकाऱ्यांना निवेदन