![]()
शहरात निर्माण झालेली अस्वच्छता, साचलेले पाणी, डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढत आहे,असा आरोप नगरसेवक चंदू खेडकर यांनी केला आहे. महापालिका आयुक्त, स्वच्छता विभागाला दिलेल्या निवेदनातून त्यांनी शहरात फॉगिंग, कीटकनाशक फवारणी, जंतूनाशक पावडरचा वापर, स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर राबविण्याची मागणी केली आहे.असे न केल्यास आपण स्वत:च पाठीवर पंप घेवून प्रभागापासून फवारणी सुरू करणार असल्याचा ईशारासुध्दा प्रशासनाला दिला आहे. नगरसेवक चंदू खेडकर यांनी या संदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, शहरात अनेक भागांत पावसाचे पाणी साचले असून, गटारे, नाल्या आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण साचलेली आहे. यामुळे डासांची पैदास झपाट्याने वाढत असून, नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. शहरातील शासकीय, खासगी रुग्णालयांमध्ये ताप,साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. खेडकर यांनी दावा केला आहे की, त्यांनी यापूर्वी अनेक वेळा महापालिका प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन या समस्येबाबत लक्ष वेधले होते. मात्र, वारंवार सूचना करूनही स्वच्छता विभागाकडून प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शहरात अनेक ठिकाणी फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी झालेली नाही, कीटकनाशक औषधांची फवारणी होत नाही, गटारांमध्ये जंतूनाशक पावडर किंवा रस्त्यांलगत ब्लीचिंग पावडर टाकली जात नाही. रस्त्यांच्या कडेला मोकळ्या भूखंडांवर वाढलेल्या गवताची छाटणीही होत नसल्याने ही ठिकाणे डासांच्या पैदासीची केंद्र बनल्याचा आरोप करण्यात आला आहे.दरम्यान, साथीच्या रोगांमुळे जीवितहानी किंवा अनुचित घटना घडल्यास त्याची नैतिक, कायदेशीर जबाबदारी महापालिका प्रशासन, विशेषतः आयुक्त, स्वच्छता विभागाची राहील, असा इशाराही नगरसेवक चंदू खेडकर यांनी निवेदनातून दिला आहे. तीन दिवसांमध्ये शहरात फवारणी सुरू न झाल्यास आंदोलन अटळ महापालिका प्रशासनाने प्रभाग क्रमांक १ (शेगाव-रहाटगाव) सह संपूर्ण अमरावती शहरात पुढील तीन दिवसांच्या आत फॉगिंग, कीटकनाशक फवारणी, ब्लीचिंग व लिंटन पावडर टाकणे तसेच गवत कापण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू करावी, अशी ठाम मागणी खेडकर यांनी केली आहे. यासोबतच त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, तीन दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास महापालिकेच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ चंदू खेडकर स्वतः सर्व आवश्यक साधनांसह रस्त्यावर उतरून संपूर्ण शहरात आंदोलनात्मक फवारणी मोहीम राबवणार असल्याचा इशारा खेडकर यांनी दिला आहे.
Source link
शहरात धुवारणी, फवारणी नाही; साथीच्या रोगांचा धोका वाढला:नगरसेवक चंदू खेडकर पंप घेऊन फवारणी करुन आंदोलन करणार