![]()
मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील ५५ वर्षीय शेतकरी राजेंद्र बाबारावजी नवघरे यांचे शुक्रवारी (आज) आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मृत्यूमागे उष्माघात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवार, २८ मे रोजी राजेंद्र नवघरे नेहमीप्रमाणे शेतातील कामासाठी गेले होते. त्यावेळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून मोर्शी तालुक्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांना शेतातील कामे करणे अत्यंत कठीण झाले आहे. तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जात असताना ग्रामीण भागात आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि उष्माघात प्रतिबंधक उपाय अपुरे असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, शेतकरी वर्गामध्ये प्रशासनाच्या उपाययोजनांबाबत संताप व्यक्त केला जात आहे. कुटुंबीय आणि स्थानिक जाणकारांनी या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, राजेंद्र नवघरे यांच्या कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकरी संघटनांकडून करण्यात आली आहे. राजेंद्र नवघरे यांच्या पार्थिवावर शनिवार, ३० मे रोजी दापोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
Source link
दापोरी येथील शेतकऱ्याचे निधन, उष्माघाताचा संशय:राजेंद्र नवघरे यांचे अमरावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन