Headlines

दर्यापूर पाणी समस्या: नगरसेविकेशी मजीप्रा अधिकाऱ्याची अरेरावी:संतप्त नागरिकांसह नगरसेविकेचा मजीप्रा कार्यालयावर मोर्चा




दर्यापूर शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) च्या उपकार्यकारी अधिकाऱ्याने नगरसेविकेशी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर संतप्त नगरसेविका व नागरिकांनी मजीप्रा कार्यालयावर मोर्चा काढला. नगरसेविका वंदना विठ्ठलसिंह सोलंकी यांनी शुक्रवारी दुपारी मजीप्राचे उपकार्यकारी अधिकारी विजय शेंडे यांच्याशी फोनवर संपर्क साधला. त्यावेळी शेंडे यांनी अरेरावीची व उद्धट भाषा वापरल्याचा आरोप सोलंकी यांनी केला आहे. या अनुभवानंतर सोलंकी यांनी प्रभागातील रहिवाशांसह मजीप्रा कार्यालयावर धडक दिली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र काही जागरूक नागरिकांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. दर्यापूरमधील राजपूतपुरा प्रभाग क्रमांक २ मधील पाणी समस्येबाबत यापूर्वी अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वीही अनेक महिला व पुरुष नागरिक नगरसेविका वंदना सोलंकी यांच्यासह जीवन प्राधिकरण कार्यालयात तक्रार करण्यासाठी गेले होते. त्यावेळी कार्यालयात केवळ दोनच कर्मचारी उपस्थित असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यानंतर आज पुन्हा फोनवर हा विसंवाद घडला. नगरसेविका वंदना सोलंकी यांनी सांगितले की, “प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांच्या पाणी समस्येबाबत मी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला असता, त्यांनी लोकप्रतिनिधींशी अत्यंत उद्धट व धमकीची भाषा वापरली. ‘तुमचे किती लोक आहेत ते घेऊन या, तुम्हाला जे करायचे आहे ते करा’ असे शब्द वापरण्यात आले. प्रशासनाकडून अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत दुर्दैवी आहे, म्हणूनच आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.” या आरोपांवर उपकार्यकारी अभियंता विजय शेंडे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “मी सदर महिलेचा फोन उचलला असता त्यांनीच तुम्ही कोण? म्हणत उद्धट भाषा वापरली. त्यावर मी पण थोडे प्रतीउत्तर दिले व फोन कट केला. प्रभाग क्रमांक दोनमध्ये याआधीच नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे. तरीही काही नागरिकांना पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे. निधी उपलब्ध होताच ही समस्या मार्गी लावण्यात येईल.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *