Headlines

मतदार यादीतून 3.53 लाख नावे वगळली; 22 मतदान केंद्रे:अमरावती जिल्ह्यात प्रारूप यादी जाहीर, दावे-हरकतींसाठी महिनाभराची मुदत




अमरावती जिल्ह्यात मतदार यादीचे सूक्ष्म पुनरिक्षण (SIR) पूर्ण झाल्यानंतर, जिल्हा प्रशासनाने सोमवारी, ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली. या यादीनुसार, जिल्ह्यातील ३ लाख ५३ हजार २८२ मतदारांची नावे कमी झाली आहेत. विशेष म्हणजे, मतदार संख्या घटूनही एकूण मतदान केंद्रांची संख्या २२ ने वाढली आहे. या प्रारूप मतदार यादीवरील दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी नागरिकांना एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. याच काळात, ज्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत, अशा नवमतदारांनाही अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर, पुढील महिन्यात दावे व हरकतींवर सुनावणी घेतली जाईल आणि ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी घोषित केली जाईल. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रस्तावित मतदान केंद्रांचे समायोजन आणि सुसूत्रिकरण करण्यात आले आहे. यामुळे, अस्तित्वात असलेल्या २ हजार ६८२ मतदान केंद्रांची संख्या २२ ने वाढून २ हजार ७०२ झाली आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांची संख्या ३४५ वरून ३५४ झाली आहे, तर अमरावती विधानसभा मतदारसंघात ३२२ वरून ३२८ आणि मेळघाट विधानसभा मतदारसंघात ३५६ वरून ३६३ झाली आहे. इतर पाच मतदारसंघांतील केंद्रांची संख्या पूर्वीप्रमाणेच आहे. जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे की, ज्यांची नावे प्रारूप मतदार यादीत नाहीत, अशा पात्र मतदारांनी आगामी ३० सप्टेंबरपर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी व सहायक नोंदणी अधिकारी यांच्याकडे त्यांचे दावे नोंदवावे. तसेच, १ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी फॉर्म क्रमांक ६ भरून मतदार यादीत नाव नोंदवावे, असे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २१ लाख ९२ हजार ३९५ मतदारांची नोंद असून, ३ लाख ५३ हजार २८२ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. भारत निवडणूक आयोगाद्वारे सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावेळी हे मतदार कोठेही आढळून आले नाहीत. एसआयआर दरम्यान, जिल्ह्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) एकूण २५ लाख ४५ हजार ६७७ मतदारांच्या तपशिलाची प्रत्यक्ष खातरजमा करण्यात आली. त्यानुसार, आज प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत जिल्ह्यातील एकूण ८ विधानसभा मतदारसंघात ११ लाख २४ हजार ८३ पुरुष मतदार, १० लाख ६८ हजार २५१ महिला मतदार आणि ६१ तृतीयपंथी मतदार असे एकूण २१ लाख ९२ हजार ३९५ मतदारांची नोंद करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *