![]()
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्तासमीकरणांना कलाटणी मिळाली आहे. २१ जागांच्या संचालक मंडळात भारतीय जनता पक्षाने ९ जागा जिंकत बँकेतील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला आहे. शिवसेनेने ४, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ८ जागा जिंकल्या आहेत. भाजप व शिवसेना मिळून महायुतीकडे १३ जागांचे स्पष्ट बहुमत असले तरी अध्यक्षपदावरून अंतर्गत रस्सीखेच सुरू झाली आहे. तर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत मोठे उलटफेर झाले. मंगळवारी लागलेल्या निवडणूक निकालात पाटण मतदारसंघात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपचे सत्यजितसिंह पाटणकर यांचा १२ मतांनी पराभव करत ४२ वर्षांनंतर देसाई घराण्याचे पाटण मतदारसंघात वर्चस्व सिद्ध केले. माणमधून ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी ५३ मते मिळवून विरोधकांचा धुव्वा उडवला. फलटणमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपले पारंपरिक वर्चस्व अबाधित ठेवले. दरम्यान, कोरेगाव सोसायटी गटात राष्ट्रवादीचे सुनील माने आणि भाजपचे सुनील खत्री यांना प्रत्येकी ४४ अशी समसमान मते पडल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली; त्यात नशिबाने साथ दिल्याने माने विजयी ठरले. सांगली बँकेत उलटफेर; सुमनताई १ मताने हरल्या सांगली जिल्हा बँक निवडणुकीत तासगाव सोसायटी गटात संजयकाका पाटील (३९ मते)यांनी माजी आमदार सुमनताई पाटील (३८ मते) यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. या पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, आ. रोहित पाटील आणि जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, जत सोसायटी गटात गोपीचंद पडळकर यांनी ५४ मते मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार विनोद पवार (३४ मते) यांचा पराभव केला. महायुतीकडे १३ चा आकडा, पण अध्यक्षपदाचा तिढा कायम! कागदावर भाजप (९) आणि शिवसेना (४) मिळून १३ संचालकांचे बहुमत स्पष्ट दिसते. मात्र, पाटणमध्ये भाजपचा पराभव करून निवडून आलेले शंभूराज देसाई अध्यक्षपदावर शिवसेनेचा दावा सांगण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे, ९ जागा जिंकल्याने भाजप स्वतःचा अध्यक्ष बसवण्यावर ठाम आहे. या अंतर्गत संघर्षाचा फायदा घेत ८ जागा जिंकलेली राष्ट्रवादी पडद्यामागून एका गटाला पाठिंबा देऊ शकते.
Source link
सातारा जिल्हा बँकेच्या 9 जागा जिंकून भाजप माेठा भाऊ:शिवसेनेला 4 जागा, 42 वर्षांनंतर मंत्री शंभुराज देसाई कुटुंबातील उमेदवार विजयी