![]()
अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (जीएमसी) अवघ्या दोन वर्षांत चौथ्यांदा अधिष्ठाता (डीन) शोधण्याची वेळ आली आहे. सध्याचे डीन डॉ. नंदकिशोर राऊत हे सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी नियत वयोमानानुसार निवृत्त झाले आहेत. त्यामुळे नवे डीन नियुक्त होईपर्यंत मंगळवारपासून पुन्हा प्रभारी राज सुरू होणार आहे. डॉ. नंदकिशोर राऊत यांच्या आधी डॉ. किशोर इंगोले यांनी डीनचा पदभार सांभाळला होता, तर सुरुवातीला डॉ. अनिल बत्रा यांनी हे पद भूषवले होते. डॉ. राऊत यांनी गेली दहा महिने डीन म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा सामान्य रुग्णालय, डफरीन रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालय एकाचवेळी जीएमसीला जोडण्याचा नवा करार करण्यात आला. यापूर्वीच्या करारानुसार केवळ जिल्हा सामान्य रुग्णालयच जीएमसीशी संलग्न होते. डॉ. राऊत यांनी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी पुरेशा वसतिगृहाची सोय आणि आवश्यक शिक्षकांची संख्या यांचा समतोल राखला. या कामात फिजीओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण जाधव, फॉर्म्याकोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. स्मिता सोनटक्के आणि फॉरेन्सिक मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सचिन गाडगे यांनी त्यांना सहकार्य केले. शासनाने डॉ. राऊत यांच्या निवृत्तीला मंजुरी दिली असली तरी, नव्या डीनबाबतचे पत्र उशिरा सायंकाळपर्यंत प्रशासनाला प्राप्त झाले नाही. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जीएमसीच्या सर्वात ज्येष्ठ प्राध्यापक तथा फॉर्म्याकोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. स्मिता सोनटक्के या प्रभारी डीन म्हणून पदभार स्वीकारतील. पदभार सोपविण्याचा आणि स्वीकारण्याचा हा अधिकृत सोपस्कार मंगळवारी सकाळी पार पडेल.
Source link
जीएमसीला दोन वर्षांत तिसऱ्यांदा नव्या डीनचा शोध:डॉ. राऊत निवृत्त; प्रभारी डीन म्हणून डॉ. स्मिता सोनटक्के पदभार स्वीकारणार