![]()
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भटके विमुक्त समाजाला आपले हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी निवडणुकीत मतांची ताकद दाखवण्याचे आवाहन केले. मतांच्या बळावरच आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. ॲड. आंबेडकर हे पुणे येथे भटके विमुक्त संयोजन समिती आणि भैरव क्रांती सेना यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषदेत अध्यक्षपदावरून बोलत होते. ही परिषद साने गुरुजी स्मारक सभागृहात पार पडली. या परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते व परिषदेचे संयोजक ॲड. डॉ. अरुण जाधव, स्वागताध्यक्ष तथा भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम, ओबीसी नेते ॲड. मंगेश ससाने, ॲड. अरविंद तायडे, प्राचार्य बाबुराव शिंदे, डॉ. दीपा राजमाने, उमाताई जाधव, अंबरसिंग चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी वासुदेव, गोंधळी, बहुरूपी, रायरंद, मरीआईवाले यांसारखे पारंपरिक लोककलावंत तसेच भटक्या विमुक्त जाती-जमातींमधील विविध संघटनांचे कार्यकर्ते व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले की, विकासाची गंगा दारापर्यंत आणायची असेल, तर प्रत्येकाने आपल्या गावात जाऊन निवडणुकीच्या वेळी ‘मी माझ्या मताची किंमत करणार नाही, स्वतःला विकणार नाही आणि दुसऱ्यालाही विकू देणार नाही’ असा निर्धार केला पाहिजे. कष्टाच्या जोरावर हक्काची भाकर खात असताना स्वाभिमानाने जगले पाहिजे. दुसऱ्यांची गुलामगिरी पत्करण्याऐवजी आपला स्वाभिमान जिवंत ठेवणे महत्त्वाचे आहे. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी १९९० साली काढलेल्या ‘बिऱ्हाड मोर्चा’ची आठवण करून दिली. त्यावेळी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी मोर्चा अडवला होता आणि गुन्हे दाखल झाले होते. वकिलांनी याचिका दाखल करून ‘हॅबिट्युअल ॲक्ट’नुसार कुणालाही गुन्हेगार ठरवता येणार नाही, असे ठणकावून सांगितले होते, ज्यामुळे तो कायदा रद्द झाला. ते म्हणाले की, न्यायालय एखादा कायदा रद्द करू शकते, परंतु नवीन कायदे विधानसभा, विधानपरिषद, राज्यसभा आणि लोकसभा या सभागृहातच करता येतात. त्यासाठी आपल्याला आपले हक्काचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे.
Source link
भटके विमुक्तांनी मतांची ताकद दाखवावी:ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे राज्यस्तरीय परिषदेत आवाहन