![]()
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा गावात गेल्या १५ ते २० दिवसांपासून शासकीय नळयोजनेचा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, महिलांनी थेट नांदगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नळ योजनेद्वारे २० दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून, स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः महिलांना लांब अंतरावर जाऊन पाणी आणावे लागते. गावात उपलब्ध असलेले पाणी दूषित असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पोटाचे विकार आणि इतर आजारांचा धोकाही वाढला आहे. शासनाच्या योजनेअंतर्गत गावात बसविण्यात आलेले वॉटर एटीएमदेखील काही दिवसांपासून बंद आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संतप्त नागरिकांनी पंचायत समिती, नांदगाव खंडेश्वर येथे धाव घेतली. त्यांनी लेखी निवेदन सादर करून गावाला लागून असलेल्या अप्पर वर्धा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाण्याची टंचाई अधिकच तीव्र झाली असून, याचा सर्वाधिक फटका महिलांना बसत आहे. “लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यासाठी सीमा मेटेकर, सोनाली ग्रेसपुंजे, मालती ग्रेसपुंजे, ज्योती कुकडकर, मनिषा ग्रेसपुंजे या महिलांनी पुढाकार घेऊन गावातील महिलांच्या सह्यांचे निवेदन गट विकास अधिकारी यांना दिले आहे. दरम्यान, पाणीटंचाईच्या झळा केवळ नांदगाव खंडेश्वर तालुक्यालाच नव्हे, तर विदर्भातील मेळघाटलाही बसत आहेत. मेळघाटच्या धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांत, विशेषतः चिखलदरा तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. चिखलदरा तालुक्यातील ८ गावांमध्ये दिवसभरात १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
Source link
दाभा गावात तीव्र पाणीटंचाई:ग्रामस्थांना 20 दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा, महिलांचे निवेदन