Headlines

दिल्ली लाठीहल्ला निषेधार्थ कँडल मार्च:आ. अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन‎




जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या तरुणांवर झालेल्या कथित अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि.२४) सायंकाळी लातूर शहरात कॅंडल मार्च काढून निषेध नोंदवण्यात आला. काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा कॅंडल मार्च काढण्यात आला, यावेळी आमदार देशमुख यांच्या पत्नी अदिती देशमुख याही या मार्चमध्ये सहभागी झाल्या होत्या. लातूर शहरातील नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी कार्यालयाशेजारून कॅंडल मार्चला सुरुवात झाली. तेथून नंदी स्टॉप मार्गे मार्च जिल्हा क्रीडा संकुल येथे पोहोचला. हातात पेटत्या मेणबत्त्या, मशाली घेऊन विद्यार्थी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी जंतर-मंतरवरील घटनेचा निषेध केला. यावेळी केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात घोषणाही देण्यात आल्या. कॅंडल मार्चमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. जंतर-मंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर झालेली कारवाई आणि मारहाण निषेधार्ह असल्याची भूमिका यावेळी काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणीही करण्यात आली. जिल्हा क्रीडा संकुल येथे कॅंडल मार्चची सांगता झाल्यानंतर सहभागी विद्यार्थी व कार्यकर्ते विसर्जित झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *