![]()
विदर्भातील खेळांचे माहेरघर अशी ख्याती असलेल्या अंबानगरीतील क्रीडा प्रेमींना मागील एका दशकापासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मी. सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅकची प्रतिक्षा असून ती अद्याप पूर्ण झाली नाही. मोर्शी रोडवरील विभागीय क्रीडा संकुलातील पं.जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गेल्या दीड वर्षापासून ट्रॅकचे काम कूर्मगतीने सुरू आहे. एकूण १२ कोटीचे बजेट असलेल्या या ट्रॅकसाठी शासनाकडून आतापर्यंत ६.७७ कोटी रु. मिळाले असून ते सार्वजनिक बांधकाम विभागाला विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयाद्वारे देण्यात आले आहे. परंतु, काही ना काही कारणांनी काम रखडल्याने अजुनही ट्रॅक सुरू होण्यास डिसेंबर २०२६ पर्यंत खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक तसेच क्रीडा प्रेमींना प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोणत्याही स्थितीत डिसेंबरपर्यंत सिंथेटिक ट्रॅक सुरू होईल, असा शब्द साबांविच्या अभियंत्यांनी दिल्याचे विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयाने सांगितले. आंतरराष्ट्रीय कंपनी शिव-नरेशकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने ४०० मी. सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅक उभारण्याची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे हे ट्रॅक अद्याप पूर्ण झाले नाही. ^सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅकचे काम संथ गतीने सुरू आहे. संपूर्ण निधी आपण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्गही केला आहे. त्यांनी शिव-नरेश कंपनीकडे ट्रॅकचे काम सोपवले आहे. कामाचा वेग वाढवण्यासाठी पुण्याचे आर्किटेक्ट शशी प्रभू यांचा सल्ला घेण्यात आला आहे. पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांसोबत त्यांची नुकतीच बैठक झाली. त्यामुळे कामाला वेग येईल, अशी आशा आहे. – गणेश जाधव, प्र-विभागीय क्रीडा उपसंचालक. ट्रॅकच्या मध्यभागी ग्रासकोर्टही अपूर्ण सिंथेटिक ट्रॅकच्या मध्यभागी ग्रास टर्फ अर्थात गवताचे मैदान तयार केले जाणार असून या ठिकाणी फुटबॉल खेळता येणार आहे. मात्र, अद्याप हे ग्रासकोर्टही अपूर्ण आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच या ट्रॅकला खरे सौंदर्य प्राप्त होणार आहे. मध्यभागी दाट हिरवे गवत आणि सभोवताल लाल रंगाचा सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅक हे दृश्य केव्हा एकदा डोळ्यांना दिसेल, याचीच आतुरतेने प्रतीक्षा सुरू आहे.
Source link
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक डिसेंबरपर्यंत पूर्ण, दीड वर्षांपासून बंद, प्राथमिक कामांमध्येच वेळ, 12 कोटींचे बजेट