.

नवीन मित्र नवीन पुस्तके व नवीन शालेय गणवेश या तीन गोष्टीच्या आनंदाच्या मेळ्याची अनुभूती तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशाच्या दिवशी ३० जून रोजी आली. नव्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे केवळ गुलाब पुष्प देऊन स्वागतच नव्हे तर त्यांची कुठे सजवलेल्या बैलगाडीतून कुठे उघड्या जीप मधून तर कुठे चार चाकी वाहनातून गावातून मंगल वाद्यासह मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांतर्फे त्यांचे जागोजागी स्वागत करण्यात आले.
खामगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १६६ शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या एकूण १८ हजार ७०४ विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवेशोत्सवाच्या दिवशी विनामूल्य शालेय गणवेश पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना गोड पदार्थ देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले. शहरापासून जवळच असलेल्या टेंभुर्णा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे अप्पर विभागीय आयुक्त शालिनी कडू यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि गणवेशाचे वितरण करण्यात आले. या शाळेतील नवप्रवेशित विद्यार्थ्यांची गावातून सजवलेल्या बैलगाडीतून मंगल वाद्यासह प्रवेश मिरवणूक काढण्यात आली तर रामनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील समग्र शिक्षा अभियानाचे गटशिक्षणाधिकारी गजानन गायकवाड व शालेय व्यवस्थापन समिती यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले .
शाळेच्या प्रवेशावेळी त्या विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल स्मृती जपण्यात आल्या. तालुक्यातील अन्य शाळांमधील प्रवेशोत्सव सोहळा आणि विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे व गणवेशाचे शालेय व्यवस्थापन समिती व मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी पालक वर्ग व शिक्षक वृंद उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या दिवशी देण्यात आलेल्या शालेय गणवेशाच्या कापडाचा दर्जा त्याची शिलाई याची गुणवत्ता तपासणीसाठी तालुक्यातील केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत आणि त्याची तपासणी करणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी गजानन गायकवाड यांनी दिली.
गणवेशाचे ४४ लाख ८८ हजार रुपयाचे वितरण सर्व शाळा व्यवस्थापन समितीने अधिकाराचा वापर करत रेडिमेड कापड दुकानातून गणवेश खरेदी केले. मुख्याध्यापकांनी समग्र शिक्षा अभियान कार्यालय खामगाव येथे बिले जमा केली आणि त्या बिलाची एकूण ४४ लाख ८८ हजार ९५० रुपये दुकानदाराच्या खात्यात जमा करण्यात आली. उर्वरित २० टक्के रक्कम ही शासनाकडून देण्यात येईल, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी गायकवाड यांनी दिली.