Headlines

दिव्य मराठी विशेष:ऑस्ट्रेलिया-पूर्व आशियाई ‘मालदिवी पाणभिंगरी’ संकटात, जायकवाडीचा गाळपेरा परदेशी पक्ष्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे अभ्यासकांचे मत




जगाच्या नकाशावर पक्षी स्थलांतराचा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जाणारा परदेशी पाहुणा ‘मालदिवी पाणभिंगरी’ (ओरिएंटल प्रेटिनकॉल) सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि पूर्व आशियातून दरवर्षी साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी भारतात दाखल होणाऱ्या या पक्ष्यांचे थवे सध्या जायकवाडी, ढेकू, गिरजा आणि सुखना जलाशय परिसरात विसावले आहेत. जायकवाडीच्या गाळपेरा भागात हे पक्षी नियमितपणे प्रजननासाठी येतात. मात्र, यंदा येथील वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे या अत्यंत दुर्मिळ पक्ष्यांच्या अस्तित्वाला आणि वंशवृद्धीला मोठा धोका निर्माण झाला आहे. ‘ग्लारिओला मालदीवरम’ हे शास्त्रीय नाव असलेला हा पक्षी साधारण २३ ते २७ सें.मी. आकाराचा असून तो शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो. खर्डी तपकिरी पाठ, गळ्याभोवती काळी गडद रेषा आणि दुभंगलेली शेपटी असलेल्या या पक्ष्यांची जागतिक संख्या चांगली आहे. तरीही गेल्या काही वर्षांत त्यांचे स्थानिक अधिवास नष्ट होत आहेत. हा पक्षी हवेतल्या हवेत डास, चिलटे आणि जमिनीवरील टोळ-नाकतोड्यांची शिकार करतो. त्यामुळे शेतीसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरतो; मात्र दुर्दैवाने आज तोच असुरक्षित बनला आहे. ट्रॅक्टरची नांगरणी ठरतेय काळ हे पक्षी जमिनीवरच उथळ जागी अंडी घालतात. १५ दिवस ते ३ आठवड्यांच्या उबवणीनंतर अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. मात्र, गेल्या १० वर्षांत बेसुमार वाढलेली गाळपेर शेती, जलाशय परिसरातील झुडपांची कत्तल आणि अंडी घालण्याच्या काळातच मोकळ्या जमिनीवर ट्रॅक्टरने केली जाणारी नांगरणी यामुळे या पक्ष्यांची अंडी आणि पिल्ले ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडली जात आहेत. निसर्गाचे चक्र बिघडण्याची भीती उन्हाळ्याच्या शेवटी पिल्ले थोडी मोठी झाली की, हा संपूर्ण समूह पुन्हा ऑस्ट्रेलिया, मालदीव आणि पूर्व आशियाच्या दिशेने प्रस्थान करतो, “परंतु कुरणे, मैदानी गवताळ प्रदेश आणि जलाशयांवर झालेल्या अतिक्रमणामुळे या परदेशी पाहुण्यांना प्रजननासाठी सुरक्षित जागा उरलेली नाही. परिणामी, त्यांची संख्या वेगाने घटत चालली असून यामुळे निसर्गाचे चक्र बिघडण्याची भीती आहे,’ अशी चिंता पक्षी अभ्यासक किशोर पाठक यांनी व्यक्त केली. वेळीच पावले उचलण्याची गरज जायकवाडी जलाशय परिसरातील शेतीसाठीचे गाळपेरे क्षेत्र मर्यादित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पक्ष्यांच्या अत्यंत संवेदनशील प्रजनन काळात मासेमारी, पर्यटकांची गर्दी आणि इतर मानवी हस्तक्षेप पूर्णपणे रोखणे गरजेचे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *