![]()
१४ जून रोजी २०२० रोजी आत्महत्या करणारा प्रख्यात अभिनेता सुशांत सिंह राजपूतची तत्कालिन व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वडिलांनी लैंगिक अत्याचार आणि हत्येचा संशय व्यक्त केलेला असताना पोलिसांनी थेट एफआयआर नोंदवून तपास का केला नाही? केवळ सीआरपीसी १७४ (अपघाती मृत्यू ) अंतर्गत मर्यादित चौकशी करत का बसलात, असा थेट सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले की, “राजकारण्यांविरोधात केलेल्या तक्रारींमध्ये किंवा आरोपांमध्ये न्यायालयाला काडीचाही रस नाही. एका वडिलांनी आपली तरुण मुलगी गमावली आहे, याच संवेदनशील दृष्टीने न्यायालय या प्रकरणाकडे पाहत आहे.’ शवविच्छेदनास ३ दिवस लागले हा मुद्दा प्रभावी ठरू शकतो सतीश सालियन यांच्यातर्फे बाजू मांडताना ॲड. नीलेश ओझा यांनी निदर्शनास आणून दिले की, दिशाचा मृत्यू १४ व्या मजल्यावरून पडून झाला असल्यास तिच्या शरीरावर त्या स्वरूपाच्या गंभीर जखमा दिसत नाहीत. शवविच्छेदनास ५० ते ७२ तास (३ दिवस) का लागले, असे म्हणत त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. मुख्य सरकारी वकील शिशिर हिरेंनी सांगितले की, “मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दोन वेळा सखोल चौकशी पूर्ण केली आहे. या तपासात कोणत्याही प्रकारचा घातपात किंवा हत्येचा पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी ही आत्महत्या/अपघाती मृत्यू असल्याचा निष्कर्ष काढला होता. कायद्याच्या अभ्यासकांच्या मते शवविच्छेदनास ३ दिवसांचा वेळ हा मुद्दा पुढील काळात प्रभावी ठरू शकतो.
Source link
दिशा सालियन मृत्यू:मुंबई पोलिसांच्या तपासावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह, बापाने तरुण मुलगी गमावलीय, आम्हाला राजकारणाशी देणंघेणं नाही