![]()
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, याचे सावट आता भारतावरही दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपल्या विभागासाठी तीन महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. मंत्री आशिष शेलार यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, देशासमोरील आर्थिक आणि इंधन संकट पाहता आमच्या विभागाने तातडीने काही पावले उचलली आहेत. जागतिक चित्रपट महोत्सवासाठी (Cannes) विभागाकडून कोणाही प्रतिनिधीने जाऊ नये, असा निर्णय घेण्यात आला आहे. विभागाच्या कामकाजासाठी इंधनावरील वाहने टाळून केवळ इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर केला जाईल. उद्यापासून माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक विभागाच्या सर्व बैठका प्रत्यक्ष न होता ऑनलाइन स्वरूपात पार पडतील, जेणेकरून प्रवासावरील इंधन खर्च वाचवता येईल. देशहितासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे या निर्णयांची माहिती देताना आशिष शेलार म्हणाले की, “सध्याची जागतिक युद्धाची परिस्थिती पाहता पुरवठा साखळीवर मोठा ताण आहे. अशा वेळी आयातीवर मर्यादा घालणे आणि भारतीय रुपयाचे मूल्य संतुलित ठेवणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपल्याला वैयक्तिक जीवनातही काही बंधने घालून घ्यावी लागतील. बाहेर फिरण्याचे प्रमाण कमी करावे लागेल. देश हे आपले कुटुंब असून देशहितासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे आहे.” राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर पंतप्रधानांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्यासोबतच वर्षभर सोने खरेदी न करण्याचे जे आवाहन केले, त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ही टीका केली की, ‘हे मोदींचे अपयश आहे’. या टीकेचा आशिष शेलार यांनी कडाडून समाचार घेतला. “राहुल गांधींचे विधान हे त्यांच्या अज्ञानाचा पुरावा आहे. देश प्रगती करत असताना त्यांना केवळ पोटदुखी होत आहे. जागतिक संकटाच्या काळात देशहितासाठी केलेल्या आवाहनावर राजकारण करणे दुर्दैवी आहे,” असा टोला शेलार यांनी लगावला. सोमनाथ स्वाभिमान पर्वाचे आयोजन मुंबईतील धाकलेश्वर मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना शेलार यांनी ‘सोमनाथ स्वाभिमान पर्वा’चाही उल्लेख केला. “सोमनाथ मंदिर हे आपल्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. परकीयांनी हे मंदिर लुटण्याचे प्रयत्न केले, पण हिंदुस्थानने आपला संघर्ष सुरू ठेवला आणि जनतेच्या सहभागातून हे मंदिर पुन्हा उभे राहिले. पंतप्रधान मोदींनी स्वतः या पर्वाची सुरुवात पूजा अर्चा करून केली आहे, ही अभिमानाची बाब आहे,” असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी काय आवाहन केले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले. आपल्याकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत. त्यामुळे सध्याच्या जागतिकि संकटाचा भारतावर अधिक परिणाम होत आहे. त्यामुळे आपण स्वयंपाकाचे तेल, पेट्रोल, डिझेल, गॅस आदींचा कमी वापर केला पाहिजे. यावर उपाय म्हणून ज्या शहरांत मेट्रो आहे, तेथील लोकांनी मेट्रोचा वापर करावा. बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व वर्क फ्रॉम होम सारख्या पर्यायांचा वापर करावा, असे ते म्हणाले.
Source link
देशहितासाठी 'कान्स' दौरा रद्द अन् बैठका ऑनलाइन होणार:पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मंत्री आशिष शेलार यांचे तीन निर्णय