![]()
संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या वचनाचा वारसा जपत, यंदाची वटपौर्णिमा श्रीक्षेत्र देहू येथे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी केली जाणार आहे. ‘निर्मल वारी हरित वारी’ अभियानांतर्गत ‘सण वृक्षांचा… संकल्प पर्यावरण संवर्धनाचा’ या संकल्पनेतून सोमवार, दिनांक २९ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ‘जगद्गुरु अभंग गाथा वन’ येथे वटवृक्ष लागवड आणि पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्षराई प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू यांच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या विशेष उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्रातील विविध प्रमुख शहरांतील दिग्गज महिला महापौरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आयोजक शिवाजी मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारतीय संस्कृतीत वटसावित्री पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महासती सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता व निष्ठेच्या बळावर सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. दीर्घायुष्य, स्थैर्य, अखंड सौभाग्य आणि पर्यावरण संवर्धनाचे प्रतीक मानल्या गेलेल्या वटवृक्षाची या दिवशी पूजा केली जाते. मोरे म्हणाले की, सध्या पूजेसाठी वडाच्या फांद्या तोडून त्या घरी आणण्याची चुकीची प्रथा वाढीस लागली आहे. या प्रथेला फाटा देऊन “वृक्ष तोडू नका, तर वृक्ष लावा आणि जगवा” हा विधायक संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. हा उपक्रम ‘वृक्षांची पूजा म्हणजेच वृक्षांचे संरक्षण’ हा बहुमूल्य संदेश देईल. या प्रसंगी महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांच्या महिला महापौर व उपमहापौर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर-गायकवाड, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर डिंपल मेहता, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी, नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आडके (आहेर), सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला बाबर यांचा समावेश आहे. हा ऐतिहासिक कार्यक्रम देहू येथील अभंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या मागे असलेल्या ‘जगद्गुरु अभंग गाथा वन’ येथे संपन्न होणार आहे. या पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत सर्व वृक्षप्रेमी नागरिक, महिला भगिनी आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले योगदान द्यावे, असे आवाहन वृक्षराई प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Source link
देहूत महिला महापौरांच्या हस्ते वटवृक्ष लागवड:पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी, 'निर्मल वारी हरित वारी' अभियानाचा भाग