Headlines

धावत्या कारने अचानक घेतला पेट, चौघांनी मृत्यूला दिला चकवा:10 सेकंदात होत्याचं नव्हतं; वाढत्या उष्णतेचा कहर? हादरवणारी घटना




राज्यात वाढत्या तापमानामुळे वाहनांना आग लागण्याच्या घटना सातत्याने समोर येत असताना उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. शहाड पूर्व परिसरातील रिलायन्स डिजिटलसमोर धावत्या टोयोटा क्रिस्टा कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कारमध्ये चार प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या सतर्कतेमुळे आणि सर्वांनी वेळीच गाडीतून बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र काही क्षणांतच संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडून पूर्णपणे जळून खाक झाली. माहितीनुसार, ही कार पॅराडाईज प्लाझा परिसरातून मुख्य रस्त्याने जात होती. प्रवास सुरू असतानाच चालकाच्या लक्षात आले की कारच्या पुढील भागातून धुराचे लोट बाहेर येत आहेत. त्याने तातडीने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. मात्र, तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. काही सेकंदांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. कारमधील चौघांनी प्रसंगावधान राखत तत्काळ दरवाजे उघडून बाहेर धाव घेतली. प्रवासी बाहेर पडताच संपूर्ण वाहन ज्वाळांनी वेढले गेले आणि कार पाहता पाहता जळू लागली. भरवस्तीत आणि मुख्य मार्गावर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीच्या उंच ज्वाळा आणि धुराचे काळे ढग दूरवरून दिसत होते. या प्रकारामुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळील दुकानदार, ग्राहक आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. काहींनी आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरणही केले. वाढत्या उष्णतेमुळे वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याच्या चर्चांनाही या घटनेनंतर पुन्हा जोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक थांबवत परिसर मोकळा केला, तर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आग इतकी भीषण होती की, तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून गेली होती. अखेरीस वाहनाचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक तपासात इंजिनमधील शॉर्ट सर्किट किंवा वायरिंगमधील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या तापमानामुळे वाहनातील इलेक्ट्रिकल यंत्रणा गरम होऊन अशा घटना घडत असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून वाहनाची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे चारही प्रवाशांचे प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. विक्रोळी परिसरातही थरारक घटना दरम्यान, मुंबईतील विक्रोळी परिसरातही रविवारी मध्यरात्री अशाच प्रकारची थरारक घटना घडली. पूर्व द्रुतगती महामार्गावरील गांधीनगर पुलाजवळ सायनहून मुलुंडकडे जाणाऱ्या एका भरधाव कारने समोरील वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की कार पलटी झाली आणि काही वेळातच तिला आग लागली. काही मिनिटांत संपूर्ण कार जळून खाक झाली. या घटनेनंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करत आग विझवली व वाहने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने या अपघातातही कोणतीही जीवितहानी झाली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *