Headlines

दलाली खाऊ नका, भ्रष्टाचार करू नका, उधळपट्टी करू नका:काँग्रेस, शरद पवार गटाचा मोदींना टोला; काटकसरीच्या आवाहनाचा समाचार




काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीच्या केलेल्या आवाहनाचा खरपूस समाचार घेतला आहे. देशाला बरबाद करण्याचा कार्यक्रम तुम्ही करायचा आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची. आता निवडणुका संपल्या की लगेच त्यांना त्याग आठवला. निवडणुका झाल्यामुळे त्यांना निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करू नका असे म्हणता येणार नाही, असे या पक्षांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले. आपल्याकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत. त्यामुळे सध्याच्या जागतिकि संकटाचा भारतावर अधिक परिणाम होत आहे. त्यामुळे आपण स्वयंपाकाचे तेल, पेट्रोल, डिझेल, गॅस आदींचा कमी वापर केला पाहिजे. यावर उपाय म्हणून ज्या शहरांत मेट्रो आहे, तेथील लोकांनी मेट्रोचा वापर करावा. बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व वर्क फ्रॉम होम सारख्या पर्यायांचा वापर करावा, असे ते म्हणाले. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या या आवाहनावरून केंद्र व राज्य सरकारला टोला हाणला आहे. पंतप्रधान मोदींचे आवाहन म्हणजे दरवाढीचे संकेत रोहित पवार म्हणाले, तेल कमी खा, पेट्रोल-डिझेल जपून वापरा, असा काटकसर करण्याचा सल्ला पंतप्रधान मोदी साहेबांनी देशाला दिला.. आजच्या युद्धजन्य परिस्थितीत हा सल्ला योग्य असला तरी याची सुरवात केंद्र सरकारने स्वतःसह देशातील सर्व भाजपशासित राज्यांनी केली तर ते अधिक योग्य ठरेल. आता भाजपाने टार्गेट ठेवलेल्या राज्यातील निवडणुका तर झाल्या आहेत, त्यामुळं ‘निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करु नका’ असं आता म्हणता येणार नाही, पण ठराविक राज्यातील बड्या कंत्राटदारांना हाताशी धरून दलाली खाऊ नका… भ्रष्टाचार करु नका.. उधळपट्टी करु नका… अनावश्यक वाहनांचा ताफा घेऊ नका… अभ्यासाच्या नावाखाली परदेश दौरे करु नका… हे भाजपशासित राज्यांना आणि विशेषतः महाराष्ट्र सरकारला आधी सांगण्याची गरज आहे. असं केलं तर कदाचित जनतेला काटकसर करण्याची गरजही पडणार नाही. महत्त्वाचं म्हणजे चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळं देश अडचणीत येऊ नये यासाठी सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सहमतीने परराष्ट्र धोरण आखलं तर सरकारवर कुणी टीकाही करणार नाही आणि देशही अडचणीत येणार नाही. आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे, पेट्रोल-डिझेल दरवाढीचे संकेत तर नाहीत ना, अशीही शंका येते, असे रोहित पवार म्हणालेत.
विजय वडेट्टीवार यांचाही मोदींवर निशाणा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणी मोदींवर निशाणा साधला आहे. 2008 च्या महाभयंकर जागतिक मंदीतही ज्या देशाचं सुकाणू हललं नाही, मंदीचे चटके बसत असतानाही आपला देश सुरक्षित राहिला. तिथे आज महासत्तेच्या नावाखाली जनतेलाच त्याग करायला सांगितलं जातंय! 2014 मध्ये अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज सांगतात पेट्रोल, डिझेल वापरू नका, सोनं घेऊ नका, खाद्यतेल कमी करा! साहेब, देशाला बर्बाद करायचं कार्यक्रम तुम्ही करायचा आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची? पाच राज्याच्या निवडणुका होईपर्यंत युद्धाचा विसर पडला होता, आता निवडणुका संपल्या की लगेच ‘त्याग’ आठवला? सल्ले द्यायला फक्त पंतप्रधान, आणि भोगायला मात्र सामान्य जनता! वाह मोदीजी वाह, असे त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधींचाही पंतप्रधानांवर निशाणा दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या प्रकरणी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. काल मोदीजींनी जनतेला त्याग करण्याचे आवाहन केले – सोनं खरेदी करू नका, परदेश प्रवास करू नका, पेट्रोलचा वापर कमी करा, खते आणि खाद्यतेलाचा वापर कमी करा, मेट्रोने प्रवास करा आणि घरून काम करा. हा उपदेश नव्हे तर अपयशाचा पुरावा आहे. गेल्या 12 वर्षांत त्यांनी देशाला अशा वळणावर आणून ठेवले आहे की, आता जनतेला सांगावे लागत आहे की काय खरेदी करावे आणि काय करू नये, कुठे जावे आणि कुठे जाऊ नये. वेळोवेळी, ते केवळ स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी जबाबदारी जनतेवर ढकलतात. देश चालवणे हे आता एका ‘तडजोड झालेल्या पंतप्रधानांच्या’ आवाक्याबाहेर गेले आहे, असे ते म्हणालेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *