![]()
पर्वती पायथा परिसरातील अभ्यासिका आणि ग्रंथालयाची तोडफोड करून साहित्याचे नुकसान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगरसेवक सूरज लोखंडे, प्रिया गदादे-पाटील यांच्यासह पाच जणांविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रारदाराला अपमानास्पद वागणूक देऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याबाबत मुकुंद अनिल ऊर्फ अनिरुद्ध गायकवाड (वय ४५, रा. राजीव गांधीनगर, पर्वती पायथा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सूरज नथूराम लोखंडे, प्रिया शिवाजी गदादे-पाटील, शिवा भिवा गदादे-पाटील, प्रेमराज शिवाजी गदादे-पाटील आणि कुमार जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांची पर्वती पायथा परिसरात शिवाजी गदादे-पाटील यांच्या कार्यालयाजवळ अभ्यासिका आणि ग्रंथालय आहे. या अभ्यासिकेला महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आरोपी अभ्यासिका आणि ग्रंथालयात शिरले. त्यांनी तेथील साहित्याची तोडफोड केली, तसेच साहित्याची चोरी केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गायकवाड हे विचारणा करण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी सर्वांसमक्ष अपमान केला आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचे त्यांनी फिर्यादीत सांगितले आहे. या प्रकरणी बेकायदा प्रवेश, तोडफोड, चोरी आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलिस विभागाचे सहायक पोलीस आयुक्त गजानन पवार पुढील तपास करत आहेत.
Source link
नगरसेवकासह पाच जणांविरुद्ध अभ्यासिकेची तोडफोड केल्याचा गुन्हा:साहित्याचे नुकसान, जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप; पुणे पोलिसांत गुन्हा दाखल