Headlines

नगरसेवक नीलेश देव यांचे आंदोलन स्थगित:मागण्यांवर निर्णय घेण्याचे मनपाचे आश्वासन‎




नागरिकांच्या मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक नीलेश देव यांनी सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून महानगरपालिका मुख्यालयाजवळ सुरू केलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन रात्री स्थगित केले. आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी आंदोलनातील सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याची हमी दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. दिवसभर विविध राजकीय, सामाजिक व नागरिक क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. संध्याकाळच्या सुमारास अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोणे, अतिरिक्त आयुक्त गणेश शहाणे, झोन अधिकारी राजेश सरफ, दिलीप जाधव आंदोलनस्थळी आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून विविध मागण्यांवर सकारात्मक भूमिका मांडली. त्यानंतर आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या दालनात संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनातील प्रत्येक मागणीवर सविस्तर चर्चा झाली आणि संबंधित विषयांवर प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाही व आवश्यक निर्णय घेण्याची हमी देण्यात आली. आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानंतर नगरसेवक नीलेश देव यांनी आंदोलन स्थगित केले. सहा दिवसांपूर्वीही झाली होती सकारात्मक चर्चा यापूर्वी १५ जुलै रोजी अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोणे यांच्यासोबत नगरसेवक नीलेश देव यांची मागण्यांवरुन सकारात्मक चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतर कोणताही लेखी आदेश न झाल्यामुळे अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता, असे नगरसेवक देव यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *