![]()
अमरावती: केंद्र सरकारने लागू केलेले चार नवे ‘लेबर कोड’ हे वेठबिगारी वाढवणारे असून, यामुळे शासकीय आणि कायमस्वरूपी नोकऱ्या संपुष्टात येतील, अशी टीका ‘आयटक’चे प्रदेश सरचिटणीस कॉम्रेड श्याम काळे यांनी केली आहे. या नव्या कायद्यांमुळे केवळ खाजगीकरण आणि नवीन वेठबिगारी सुरू होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. कामगारांनी याविरोधात संघटित होऊन लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी केले. या लेबर कोडला विरोध करण्यासाठी ‘आयटक’ने येत्या १० ऑगस्ट रोजी देशव्यापी ‘जेल भरो’ आंदोलनाची हाक दिली आहे. कामगारांच्या हिताचे ४४ कायदे गोठवून केंद्र सरकारने हे चार नवे लेबर कोड अस्तित्वात आणले आहेत. ते रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अमरावती येथील नमूना चौथी गल्ली येथील संघटनेच्या कार्यालयात विस्तारित सभा घेण्यात आली. या बैठकीला राज्य सरचिटणीस कॉम्रेड श्याम काळे प्रामुख्याने उपस्थित होते. ज्येष्ठ कामगार नेते तथा एसटी महामंडळाचे निवृत्त कर्मचारी जे.एम. कोठारी यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी भाकपचे जिल्हा सचिव सुनील मेटकर, बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय मंडवधरे, अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेश जाधव आणि सचिव ममताताई सुंदरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या आंदोलनात कामगार, शेतकरी, शेतमजूर आणि सर्व कष्टकरी समुदायाने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन इतर नेत्यांनी केले. बैठकीत एम.एस.ई. वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन, आशा व गटप्रवर्तक संघटना, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना, घरेलू कामगार मोलकरीण संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन आदी संघटनांचे पदाधिकारी ज्ञानेश्वर मेश्राम, प्रज्ञाताई बनसोड, जयेंद्र भोगे, रेखाताई हिंगे, सुनिता चहांदे, अर्चनाताई भांडवलकर, सुनील घटाळे, इंदुताई बोके, सागर दुर्योधन आदी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव कॉम्रेड निळकंठ ढोके यांनी केले. संयुक्त कामगार कृती समिती आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्यावतीने १० ऑगस्ट रोजी हे ‘जेल भरो’ आंदोलन अमरावतीत होणार आहे. त्यासाठी सर्व संघटनांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी सकाळी ११ वाजता इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून पुढे ‘जेल भरो’ आंदोलन केले जाईल.
Source link
नवे लेबर कोड वेठबिगारी वाढवतील:'आयटक'ची टीका; अमरावतीत 10 ऑगस्टला 'जेल भरो' आंदोलन, श्याम काळे यांचे आवाहन