Headlines

जुहूमध्ये लुटमारीच्या उद्देशाने सुरक्षा रक्षकाचा खून:स्वयंपाक्याच्या कटाचा पर्दाफाश, 5 आरोपी अटकेत; व्यापाऱ्याचे कुटुंब संपवण्याचा होता प्लॅन




मुंबईतील जुहू परिसरात एका रहिवासी इमारतीमधील व्यावसायिकाला लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मनोजकुमार अयोध्या यादव (वय 38) असे या मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. आरोपींनी मनोजकुमारला मारहाण करून त्याचा गळा आवळला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीत फेकून दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी जुहू पोलिस ठाण्यात 2 ऑगस्ट रोजी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवत या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. गुन्हा दाखल होताच पश्चिम परिमंडळ-2 च्या पोलिस उप आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके स्थापन करून तपासाला गती देण्यात आली. या तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, ज्या व्यापाऱ्याच्या घरात चोरीचा कट होता, त्याच कुटुंबात स्वयंपाकी म्हणून काम करणारा नोकर आणि त्याचा मित्र यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जोगेश्वर उदन मल्लिक उर्फ किशन आणि त्याचा मित्र विजय गोंजारी यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता या संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला. दोन वर्षांपासून रचत होता लुटमारीचा कट पोलिस तपासात उघड झाले की, मुख्य सूत्रधार असलेल्या स्वयंपाकी जोगेश्वरने तब्बल दोन वर्षांपासून या लुटमारीचा कट रचला होता. त्याने फ्लॅटची बनावट चावी तयार केली होती. ज्या व्यापाऱ्याकडे तो काम करत होता, तो व्यापारी, त्याची पत्नी आणि मुलगी यांची हत्या करून घरातील रोख रक्कम व दागिने लुटण्याची त्याची भयानक योजना होती. हा कट अमलात आणण्यासाठी त्याने मित्र विजय गोंजारेच्या मदतीने शरद येरुडकर (41), महादेव येरुडकर (35) आणि अनिकेत बोरनाक (30) या आणखी तीन साथीदारांना या गुन्ह्यात सामील करून घेतले. अशी केली सुरक्षा रक्षकाची हत्या कट नियोजनानुसार, जोगेश्वरने आधी त्याच्या साथीदारांची ओळख सुरक्षा रक्षक मनोजकुमार यादव याच्याशी करून दिली. 1 आणि 2 ऑगस्टच्या मध्यरात्री सर्व आरोपी इमारतीजवळ जमले आणि मनोजकुमारसोबत दारू पिण्यास बसले. संधी मिळताच त्यांनी मनोजकुमारला बेदम मारहाण केली, कापडी रस्सीने त्याचा गळा आवळला आणि हात बांधून त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून दिला. त्यानंतर पहाटे 4 वाजेच्या सुमारास आरोपींनी व्यापाऱ्याच्या 6 व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये प्रवेश करण्यासाठी बनावट चावीचा वापर केला, मात्र दरवाजा न उघडल्याने त्यांचा प्रयत्न फसला आणि त्यांनी तिथून पळ काढला. अटक केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांची कामगिरी हा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पथकांनी अथक प्रयत्न केले. अपर पोलिस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) अभिनव देशमुख आणि पोलिस उप आयुक्त (परिमंडळ 2) मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास पार पडला. सहायक पोलिस आयुक्त विनोद गावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापुराव गावडे, पोलिस निरीक्षक अतुल माळी, संतोष जाधव यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि रणजित चव्हाण, पोउपनि बाळासाहेब पोटे, सपोनि यश पालवे, सपोनि हनमंत कुंभार आणि पोउपनि सूर्यकांत ओमासे यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी या क्लिष्ट गुन्ह्याचा यशस्वीरित्या छडा लावला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *