Headlines

अमरावतीत अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा:रस्त्यांचा श्वास मोकळा, कारवाई टाळण्यासाठी नागरिकांना अल्टिमेटम




अमरावती शहरात अतिक्रमणांची गंभीर समस्या लक्षात घेता, महानगरपालिका प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत शहराच्या विविध भागांतून अतिक्रमणे हटवून रस्त्यांवरील अडथळे दूर करण्यात आले आहेत. यामुळे रस्त्यांसह सार्वजनिक जागा मोकळ्या झाल्या आहेत. रस्त्याच्या कडेला, नाल्यांवर आणि सरकारी कार्यालयांच्या भिंतींजवळ मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली होती, ज्यात काही ठिकाणी पक्के शेडही उभारले होते. या अतिक्रमणांमुळे परिसरातील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. आता ही अतिक्रमणे हटवल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महानगरपालिका आयुक्त महेश गोंदावले यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत सिद्धार्थनगरमध्ये सार्वजनिक जागेवरील सुमारे २२ अतिक्रमणे हटवण्यात आली. या अतिक्रमणांमुळे परिसरात पावसाचे पाणी साचून अडथळा निर्माण होत होता. संबंधित नागरिकांना स्वतःहून अतिक्रमण काढण्याबाबत पूर्वसूचना देण्यात आली होती, परंतु त्यांनी ती काढली नाहीत. त्यामुळे झोन क्रमांक दोनच्या बांधकाम, स्वच्छता व अतिक्रमण निर्मूलन विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली. या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणांवरही लवकरच कारवाई केली जाईल, तसेच इतर भागांतील अतिक्रमणे हटवून मुख्य रस्ते आणि फूटपाथ खुले केले जातील, अशी माहिती महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा उपअभियंता अविनाश रघटाटे यांनी दिली. या कारवाईदरम्यान अविनाश रघटाटे यांच्यासह शाखा अभियंता दिनेश हंबर्डे व लक्ष्मण पावडे, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख योगेश कोल्हे, स्वास्थ निरीक्षक कलोसे, निरीक्षक अन्सार अहमद व संदीप सोनवणे तसेच गाडगे नगरचे पोलीस पथक उपस्थित होते. अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख योगेश कोल्हे यांनी सांगितले की, जोपर्यंत शहरातील रस्ते व फूटपाथ पूर्णपणे मोकळे होत नाहीत, तोपर्यंत ही मोहीम सुरू राहील. ज्या नागरिकांनी अतिक्रमणे केली आहेत, त्यांनी ती स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा महानगरपालिका प्रशासन ती हटवेल आणि संबंधित व्यक्तींना कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *