Headlines

वसुलीसाठी येणाऱ्या बँकवाल्यांना चपलेने झोडपा, मी पाठीशी!:विजय वडेट्टीवार म्हणाले- दुष्काळात शेतकऱ्यांच्या पोटात अन्न नाही अन् पुण्यात चालून जिरवण्यासाठी 700 कोटींचा जॉगिंग ट्रॅक




“एकीकडे दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याच्या पोटात अन्नाचा दाणा नाही, शेतकऱ्यांच्या मुलांकडे कॉलेजची फी भरायला पैसे नाहीत; आणि दुसरीकडे मात्र खाल्लेले जिरवण्यासाठी पुण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) तब्बल 700 कोटी रुपयांची निविदा काढून ‘पाथवे’ (जॉगिंग ट्रॅक) बांधला जात आहे. या राज्यात ‘अंधेरी नगरी अन् चौपट राजा’ असा भोंगळ कारभार सुरू आहे. दुष्काळी भागात जर कोणी बँकवाला किंवा मायक्रो फायनान्स कंपनीचा माणूस वसुलीसाठी दारात आला आणि महिलांचे फोटो काढू लागला, तर त्याला तिथल्या तिथे चपलेने झोडपून काढा! मला थेट फोन करा, मी तुमच्या पाठीशी उभा राहीन,” असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी तरुणांच्या आंदोलनावरील दडपशाही, निवडणूक आयोगाचा कारभार, महायुतीतील धुसफूस आणि राज्यातील भीषण दुष्काळावरून केंद्र व राज्य सरकारची लक्तरे वेशीवर टांगली. दरम्यान, याच दुष्काळी प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा भव्य ‘जनआक्रोश दुष्काळ मोर्चा’ धडकणार आहे. वसुली करणाऱ्यांना बडवून काढा! दुष्काळग्रस्त भागातील बँकांची सक्तीची वसुली आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रश्नावरून वडेट्टीवार चांगलेच संतापले. “सरकारने कर्ज पुनर्गठनाचे आदेश दिल्याचे कागदावर सांगितले जाते, पण प्रत्यक्षात अकोल्यासह अनेक जिल्ह्यांत बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्सचे लोक घरादारात घुसून महिलांचे फोटो काढत आहेत. आधीच खिशात दमडी नाही आणि वरून हा छळ सुरू आहे. माझे दुष्काळी भागातील जनतेला जाहीर आवाहन आहे की, जबरदस्तीने वसुली करणाऱ्यांना चपलेने बदडून काढा. मी स्वतः माझा मोबाईल नंबर देतोय, मला फोन करा; अशा मुजोर बँकवाल्यांना आम्ही वठणीवर आणू.” शैक्षणिक शुल्काचा गंभीर प्रश्न “सरकारने केवळ 300-400 रुपयांची परीक्षा फी माफ केल्याचा जीआर काढून शेतकऱ्यांना मूर्ख बनवले आहे. प्रत्यक्षात इंजिनिअरिंग, मेडिकल, एमएससी आणि व्यावसायिक महाविद्यालयांची १ लाख ते ३ लाख रुपयांची संपूर्ण शैक्षणिक फी आणि हॉस्टेलचा खर्च शेतकऱ्याने कुठून आणायचा? शेतात एक दाणा पिकला नसताना फीसाठी महाविद्यालयांनी तगादा लावल्याने हजारो मुले शिक्षण सोडून घरी बसली आहेत.” “शेजारच्या कर्नाटकात दुष्काळी मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली, पण महाराष्ट्रात अजून पत्ता नाही. पंचनाम्यांचे नाटक बंद करून सरकारने दिवाळीपूर्वी सरसकट प्रतिहेक्टरी १ लाख रुपयांची मदत दिलीच पाहिजे.” गृहमंत्र्यांनी 12 वर्षांत किती घुसखोर हाकलले? दिल्लीत ‘सीजेपी’च्या (CJP) आंदोलक तरुणांना पोलीस कोठडीत डांबल्याच्या प्रकारावर त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला. “सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात बोलणे हा गुन्हा आहे का? आंदोलक तरुण काही दहशतवादी किंवा नक्षलवादी आहेत का? कोणाला एक दगडही न मारणाऱ्या सौरव दास आणि शिंदे या तरुणांना 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली जाते. ‘हम करे सो कायदा’ या हिटलरशाहीने सरकार तरुणांचा आवाज दाबू पाहत आहे. पुढच्या महिन्याभरात देशातील तरुण एकजुटीने रस्त्यावर उतरतील, तेव्हा तुमचे जेल कमी पडतील.” दसऱ्यानंतर आंदोलनाची धार वाढणार “नवरात्र आणि दसऱ्यानंतर ‘इंडिया’ आघाडी या आंदोलनाची धार अधिक तीव्र करणार आहे. जोपर्यंत मतचोरीला संरक्षण देणारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील हा लढा थांबणार नाही.” अमित शहांना थेट सवाल “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मतदारयादीत घुसखोर असल्याचा बागुलबुवा करत आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत १२ वर्षे तुमचीच सत्ता आहे, मग तुम्ही आजवर किती घुसखोरांना देशाबाहेर हाकलले, याचा आकडा जाहीर करा! केरळमध्ये भाजपला दीड टक्का मते आहेत, तिथे ईव्हीएम किंवा एसआयआरचा खेळ केला तर उघडे पडतील म्हणून तिथे हात घालत नाहीत; पण गुजरातमध्ये यंत्रणा आणि पैशांच्या जोरावर निवडणुका कशा जिंकल्या जातात हे सर्व देशाला ठाऊक आहे.” फाईल्स अडवून महाराष्ट्राची जिरवतायत! राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत वादावर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले, “मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये संवाद पूर्णपणे संपला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बैठका सुरू आहेत. तिन्ही पक्षांत एकमेकांचे तोंडही न पाहण्याइतपत टोकाचे मतभेद असून एकमेकांच्या खात्यांच्या फाईल्स अडवल्या जात आहेत. सत्तेच्या लोभापायी एकमेकांची जिरवण्याच्या नादात हे लोक संपूर्ण महाराष्ट्राची जिरवत आहेत. या शीतयुद्धाचा भडका कधीही उडेल आणि तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात रस्त्यावर उतरलेले दिसतील.” साखरेला 55 रुपये भाव, मग उसाला 5 हजार का नाही? “जेव्हा साखर 28 रुपये किलो होती, तेव्हा एफआरपी (MSP) 3100 रुपये होती. आज बाजारात साखर 55 रुपये किलोने विकली जात असताना उसाला प्रतिटन ५००० रुपये दर देण्याची राजू शेट्टींची मागणी पूर्णपणे रास्त आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी हात वर केल्याने शेतकऱ्यांसमोर आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही.” तांदूळ घोटाळा आणि अवैध जुगार अड्डे “गोंदियातील तांदूळ घोटाळ्याप्रकरणी माझ्या तक्रारीनंतर एसआयटी (SIT) स्थापन होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे; दोषींना सोडणार नाही. तसेच सीमाभागात तेलंगणा व आंध्रातून येणाऱ्या लोकांच्या माध्यमातून सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेले अवैध जुगार अड्डे तात्काळ बंद करण्यासाठी मी पोलीस महासंचालक व गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे.” सिंगल सोना महापात्रा यांना सुनावले राहुल गांधींवर टीका करणाऱ्या गायिका सोना महापात्रा यांना टोला लगावताना ते म्हणाले, “हिमाचलच्या कचऱ्याची चिंता करणाऱ्यांनी मुंबईत अंधेरीत येऊन ८ दिवस राहावे, म्हणजे महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी केलेली गहान आणि दुरवस्था त्यांना कळेल.” छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भव्य ‘जनआक्रोश दुष्काळ मोर्चा दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य ‘जनआक्रोश दुष्काळ मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चामध्ये विजय वडेट्टीवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते आणि मराठवाड्यातील हजारो दुष्काळग्रस्त शेतकरी सहभागी होत आहेत. शेतकऱ्यांना विनाअट सरसकट मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्याची मागणी या मोर्चातून सरकारकडे केली जाणार आहे. ——————————————– हेही वाचा… SIR वरून पसरवले जाणारे 8 गैरसमज, नेमकी वस्तुस्थिती काय?: विरोधकांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीस मैदानात, जनतेला थेट आवाहन! केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशभरात राबवण्यात येत असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेवरून (SIR) विरोधकांनी ‘मतचोरी’ आणि कोट्यवधी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करत रान उठवले असतानाच, आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात उडी घेतली आहे. विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या संभ्रमाला पूर्णविराम देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर (X/ट्विटर) सविस्तर माहिती प्रसिद्ध करत ‘गैरसमज विरुद्ध वस्तुस्थिती’ जनतेसमोर मांडली आहे. “कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी आजच मतदारयादीतील आपले नाव, पत्ता व इतर तपशील तपासून घ्यावेत आणि आपला मतदानाचा पवित्र हक्क सुरक्षित ठेवावा,” असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील जनतेला केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *