Headlines

नागपूरच्या मारबत उत्सवाला आता जागतिक स्वरूप:मनपाची 2 कोटींची तरतूद; 145 वर्षांच्या परंपरेला महोत्सवाचे स्वरूप




नागपूरचा 145 वर्षांचा मारबत-बडग्याचा उत्सव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची तयारी नागपूर महानगरपालिकेने (मनपा) सुरू केली आहे. यंदा प्रथमच मनपाने या उत्सवासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पारंपरिक मिरवणुकीला महोत्सवाचे स्वरूप देऊन देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याचे मनपाचे नियोजन आहे. मारबत उत्सव ही केवळ धार्मिक परंपरा नसून, नागपूरच्या लोकसंस्कृती आणि सामाजिक अभिव्यक्तीचे एक वैशिष्ट्यपूर्ण माध्यम आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी निघणाऱ्या या मिरवणुकीत काळी-पिवळी मारबत आणि बडग्यांच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय प्रश्नांवर भाष्य केले जाते. महाराष्ट्र पर्यटन विभागानेही या उत्सवाला नागपूरच्या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सवाचा दर्जा दिला आहे. मनपा यंदा उत्सवाचे व्यावसायिक पद्धतीने आयोजन आणि व्यापक ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तींना निमंत्रित करण्याची योजना आहे. तसेच, उत्सवासाठी विशेष बोधचिन्ह, स्मृतिचिन्हे आणि थीमवर आधारित मारबत-बडग्यांच्या संकल्पना तयार करण्याचे नियोजन आहे. मिरवणूक मार्गाचा कायापालट करण्यावरही भर दिला जाणार आहे. यात खड्डे बुजविणे, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा व अन्य अडथळे दूर करणे, पाणी व वीज व्यवस्था पुरवणे, तसेच प्रमुख ठिकाणी स्वागत कमानी व स्टेज उभारणे यांचा समावेश आहे. गर्दी आणि वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस, मनपा आणि उत्सव समित्यांचा समावेश असलेली एक विशेष समन्वय समिती स्थापन केली जाईल. या माध्यमातून मनपाला नागपूरच्या सांस्कृतिक वारशाला पर्यटनाशी जोडून शहराची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवायची आहे. मात्र, उत्सवाचे आधुनिकीकरण करताना त्याचे पारंपरिक स्वरूप आणि लोकसहभाग कायम ठेवण्याचे आव्हानही मनपासमोर असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *