![]()
नाशिक- हरसूल रस्त्यावरील कश्यपी धरणानजीक सुट्टीसाठी आलेले मखमलाबाद येथील सचिन कैलास ठोंबरे (३२), त्यांची गरोदर पत्नी रोहिणी ठोंबरे आणि त्यांच्यासोबत असलेली, शेजारी राहणारी दोन १६ व १४ वर्षीय मुले यांचा कश्यपी धरणात बुडून मृत्यू झाला.
.
संगीता घाडगे या महिलेने पाण्याजवळ धावत जाऊन ठोंबरे यांच्या दोन वर्षाच्या मुलीला वाचवले. त्यानंतर या महिलेने आरडाओरड करून घटनेची माहिती धरणालगतच्या खाड्याची वाडी, धोंडेगाव येथील तरुणांना दिली. या घटनेत बुडालेली दोन मुले केतन अनिल पवार (१६) आणि कौशल्य अनिल पवार (१४) ही असून ती मानकर मळा येथे ठोंबरे कुटुंबियांच्या शेजारी राहात असल्याचे निष्पन्न होत असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे यांनी सांगितले. धरणालगतच्या गावात कुस्ती स्पर्धा सुरू होती. घटनेची माहिती मिळताच उपस्थित तरुणांनी थेट खोल पाण्यात उड्या घेऊन बुडणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला. तातडीने धाडसी पावले उचलल्याने ते सापडले, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
दोन वर्षांपासून नाशकात स्थायिक
सचिन ठोंबरे हे सिव्हिल इंजिनिअर होते. ते संगमनेर तालुक्यातील ठोंबरे वस्ती, पिंपरणे येथील मूळचे रहिवासी होते. दोन वर्षांपूर्वी ते व्यवसायानिमित्त नाशिक येथील मखमलाबाद नाका परिसरात स्थायिक झाले होते. सुट्टीच्या दिवशी ते सहपरिवार कश्यपी धरणावर फिरण्यासाठी गेले. त्यावेळी ही दुर्घटना घडली.
धाडसी महिलेमुळे ठोंबरेंची २ वर्षीय बालिका वाचली
आम्ही धरणकाठावर उभे असताना लहान बाळ पाण्याकडे जाताना पाहिले. ही दोन वर्षांची लहान मुलगी रडत ‘मम्मी-पप्पां’कडे जाण्यासाठी पाण्याकडे बोट दाखवत असल्याचे लक्षात आले. मी पाण्याजवळ धावत जाऊन त्या लहान बाळाला उचलून घेतले. त्यानंतर शेजारील चपलांचे जोड पाहून एकाच कुटुंबातील व्यक्ती पाण्यात बुडाल्याचे लक्षात आले. लगेचच परिसरातील रहिवाशांना या घटनेची माहिती दिली. बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी तरुणांनी धरणात उड्या घेतल्या.