![]()
नाशिकच्या अशोक खरातने मांडलेल्या भोंदूगिरीच्या खेळाचा तपास सुरू असतानाच, आता अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून अशाच एका लुटारू बाबाचा प्रताप उघडकीस आला आहे. मंत्रांच्या जोरावर शारीरिक व्याधी दूर करण्याचा दावा संगमनेरच्या कोल्हेवाडी येथील ‘दत्तधाम’मधील एक बाबा करत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, स्वतःला ‘गडगे महाराज’ म्हणवणारा हा व्यक्ती मूळचा गवंडी असून, सिमेंटच्या टाक्या बनवण्याच्या व्यवसायाआडून त्याने श्रद्धेच्या नावाखाली लुटालूट सुरू केली होती. कोल्हेवाडीतील दत्तधाम आश्रमात सध्या या तथाकथित महाराजाचा दरबार भरत असून, मंत्रोच्चाराने कॅन्सरसारखे आजारही बरे होतात, असा बनाव या ठिकाणी केला जात आहे. भोंदू बाबाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भक्तांची मोठी गर्दी जमू लागली होती. मात्र, या उपचारांच्या बदल्यात हा बाबा ११ हजार, २१ हजार ते चक्क ५२ हजार रुपयांपर्यंतच्या देणग्या उकळत असल्याचे समोर आले आहे. एका गरीब महिलेला तर या बाबाची दक्षिणा देण्यासाठी आपल्या पायातील ‘जोडवी’ गहाण ठेवावी लागल्याची हृदयद्रावक माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, मी पुजेसाठी लागणारे पैसे लोकांकडून घेतोय, त्याउपर त्यांच्याकडून इतर कोणतेही पैसे घेत नाही, असे स्पष्टीकरण गडगे महाराजाने दिले. गवंडी कामाकडून महाराजकीकडे गावकऱ्यांनी या बाबाचा इतिहास उकरून काढला असता, त्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कोणताही आध्यात्मिक वारसा नसलेला हा व्यक्ती गवंडी असून सिमेंटच्या टाक्या बनवण्याचे काम करायचा. “ज्या दिवशी माझ्या पाहुण्याला उपचारादरम्यान त्रास झाला, तेव्हा हा महाराज पळून गेला,” असा आरोप एका ग्रामस्थाने केला आहे. तसेच, या बाबावर दोन लग्ने केल्याचे आणि आश्रमाच्या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच आढळल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. ‘अनिस’ आक्रमक; पोलिसांकडे कारवाईची मागणी या भोंदूगिरीची दखल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (ANIS) घेतली असून, पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा छडा लावून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. भोंदू बाबाचे गोरखधंदे तातडीने बंद करून गुन्हे दाखल करावेत, अशी भावना स्थानिक नागरिकांमध्ये आहे. परिसरात दारूच्या बाटल्या सापडल्याने या ठिकाणी अन्य बेकायदेशीर कृत्य सुरू असण्याचा संशयही बळावला आहे. गडकेंच्या भक्तांनी काय सांगितले? गडगे महाराज यांनी वयाच्या बारा वर्षांपासून दत्तगुरूंची ध्यान साधना करत एक तप पूर्ण केले. फळरूप म्हणून महाराजांना दत्तगुरूंची कृपा झाली. महाराजांनी दत्तगुरूंचे भव्य मंदिर उभारले. गेली तीस वर्षांपासून महाराज दरबारात येणाऱ्या भक्तांच्या समस्या सोडवतात, असे गडगे महाराज यांचे भक्त सांगतात.
Source link
नाशिकनंतर संगमनेरमध्ये भोंदूबाबा:मंत्रांच्या उच्चाराने आजार बरे करण्याचा दावा, 50 हजारांपर्यंतचे डोनशेन घेतले; कारवाईची मागणी