.


महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज अहिल्यानगरमध्ये भक्ती आणि शक्तीचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी भीमप्रेमींचे जत्थे मार्केट यार्ड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात येते होते. “महामानवाच्या विचारांनी न्हाले नगर” असेच काहीसे चित्र आज संपूर्ण शहरात दिसत होते.
मार्केट यार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादनासाठी अनुयायांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेत आपल्या उद्धारकाला नमन करण्यासाठी अबालवृद्ध सरसावले होते. हातात निळे ध्वज आणि ओठांवर ‘जय भीम’चा मंत्र घेऊन येणाऱ्या प्रत्येक अनुयायाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच स्वाभिमान झळकत होता.
समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला : कदम
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभे आयुष्य दिन दलित, उपेक्षित, वंचित वर्गासाठी घालवले. या वर्गासाठी बाबासाहेबांनी जे कार्य केले ते तर सर्वानाच माहीत आहे. त्यांनी महिलांसाठी जे कार्य केले ते याआधी कोणीही करू शकले नाही. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला, असे प्रतिपादन शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले. अहिल्यानगर शिवसेनेतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मार्केट यार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम ,गटनेते दत्तात्रय कावरे ,संजय शेंडगे, सचिन जाधव , सुरेखा कदम, शाम नळकांडे, दत्ता जाधव, सचिन शिंदे, सुवर्णा जाधव, संतोष गेणप्पा, संदीप दातरंगे, काका शेळके, सुरेश तिवारी,महिला जिल्हाध्यक्षा स्वाती जाधव नलिनी गायकवाड आदी उपस्थित होते.
श्री विशाल गणेश मंदिरातर्फे
पुष्पहार अर्पण
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिराच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडित खरपुडे, सचिव अशोक कानडे, विजय कोथिंबिरे, प्रा.माणिक विधाते, गणेश राऊत आदि उपस्थित होते.
विजय कोथिंबिरे म्हणाले, डॉ.बाबासाहेबांच्या विचारातच देशाचे, अखिल मानवजातीचे कल्याण आहे. डॉ.बाबासाहेबांचे मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहोचतील. त्यातून देशाची राज्यघटना, एकता, समता बंधूतेचा विचार अधिक मजबूत होईल, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.
मनसेतर्फे अभिवादन
भारताच्या कायदा, सुव्यवस्था आणि संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे योगदान होते. त्यांनी नवीन कायदे केले आणि त्यांना इतर जातींप्रमाणे शिक्षण आणि समान अधिकार दिले. त्यांचे विचार आणि आदर्श आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन मनसे शहर सचिव डॉ.संतोष साळवे यांनी केले. मनसेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मनसे जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ ,शहर सचिव डॉ संतोष साळवे, शहर उपाध्यक्ष दीपक दांगट ,संकेत व्यवहारे, विभाग अध्यक्ष प्रशांत जाधव ,अभिनय गायकवाड उपस्थित होते.
संविधानच देशाचे अखंडत्व
टिकवू शकते : किरण काळे
आज देशामध्ये परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. आपल्या राजकीय अजेंड्यासाठी देशाला अस्थिर करण्याचे डाव काही प्रवृत्ती राबवित आहेत. मात्र देशाला स्थिर, एकसंध ठेवण्याची ताकद देशाच्या संविधानात आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच देशाचे अखंडत्व टिकवू शकते, असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे. डॉ.आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केल्यानंतर त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. यावेळी संजय झिंजे, मनोज गुंदेचा, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, रावजी नांगरे, दीपक भोसले, राम वाणी, राम झिने, अलतमश जरीवाला, रोहन शेलार, चंद्रकांत उजागरे, संतोष घरवाढवे, मतीन शेख, उषा भगत, शैला लांडे उपस्थित होते.
राज्य घटनेद्वारे देशाला एकसंघ ठेवण्याची किमया डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगातील सर्वोत्तम अशी राज्यघटना दिली आहे. या राज्य घटनेच्या माध्यमातूनच आपण प्रजासत्ताक आणि बलशाली राष्ट्र म्हणून वाटचाल करत आहोत. तसेच विविधतेने नटलेल्या आपल्या देशाला राज्य घटनेच्या एका सुत्रात गुंफून एकसंघ ठेवण्याची किमया डॉ.बाबासाहेबांनी केली आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, भौगोलिक विविधतेच्या भारत देशाला एकता, समता बंधूतेच्या सूत्रात बांधण्याचे, देशाची सार्वभौमता अखंडित ठेवण्याचे काम बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे शक्य झाले आहे, असे श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी सांगितले.