Headlines

नीट पेपरफुटी; पुण्यात छावा संघटनेचे तीव्र आंदोलन:अंगावर डिझेल ओतून घेण्याचा प्रयत्न, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट




पुण्यात नीट २०२६ परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित शिक्षण माफिया, एजंट आणि कोचिंग क्लासेसवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणी अटक करण्यात आलेले आरसीसी क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष शिवराज मोटेगावकर आणि इतर आरोपींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर तीव्र संताप व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान, अखिल भारतीय छात्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे यांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न केला. यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली, ज्यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी बोलताना मच्छिंद्र चिंचोळे म्हणाले की, देशभरात सातत्याने घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत करून परीक्षा देतात, मात्र काही शिक्षण माफिया आणि भ्रष्ट प्रवृत्तीमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे. लातूर येथे या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी, या संपूर्ण रॅकेटमागील सर्व संबंधितांची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. पुण्यातील अनेक कोचिंग क्लासेस नियमबाह्य प्रवेश प्रक्रिया राबवत असून, मोठमोठ्या जाहिराती आणि खोट्या यशकथा दाखवून विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत. काही संस्थांकडून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी आकारली जात असून, गुणवत्तेपेक्षा केवळ व्यावसायिक फायद्यासाठी शिक्षण व्यवस्था चालवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा संस्थांची आर्थिक चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *