Headlines

नीलेश राणेंच्या टीकेला कोणीही गांभीर्याने घेऊ नये!:आधी भाजपवर टीका करायची अन् नंतर वडिलांमार्फत सेटलमेंट करायची हा त्यांचा जुनाच धंदा; वैभव नाईकांची टीका




“भाजपच्या जिवावर निवडून यायचे, त्यांच्याच नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची आणि प्रकरण अंगाशी आले की वडिलांमार्फत भाजपशी तडजोड (कॉम्प्रोमाईज) करायची, हा निलेश राणे यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा ठरलेला राजकीय पॅटर्न आहे. त्यामुळे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर निलेश राणे यांनी केलेल्या टीकेला कोणीही गांभीर्याने घेण्याची अजिबात गरज नाही,” अशा अत्यंत तिखट शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलताना आमदार वैभव नाईक यांनी भाजप-शिवसेनेतील अंतर्गत वाद, ठाकरे-शिंदे मनोमिलनाची चर्चा, निलेश राणेंची दुटप्पी भूमिका आणि आमदार संजय गायकवाड यांनी शेतकरी आत्महत्येबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून महायुतीवर तोफ डागली. वडिलांमार्फत भाजपशी सेटलमेंट करणे हा राणेंचा जुनाच धंदा! भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांना नीलेश राणे यांनी ‘लायकीत राहा’ असा दम भरल्याच्या मुद्द्यावर नाईक म्हणाले, “नीलेश राणे आज नवनाथ बन यांच्यावर तुटून पडले आहेत, पण उद्या त्यांचे वडील (नारायण राणे) नवनाथ बन यांना सांगतील की, ‘नीलेशच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, ते मनावर घेऊ नका.’ भाजपच्या भरवशावर स्वतःचे राजकारण चालवायचे आणि भाजपच्याच प्रवक्त्यांना धमकावायचे, हे राणेंचे ढोंग संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. भाजपसोबत राहायचे आणि सोयीनुसार त्यांच्यावरच तोंडसुख घेऊन नंतर पडद्यामागून सेटलमेंट करायची, हीच राणेंची कार्यपद्धती राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांकडे कोणीही लक्ष देत नाही.” शिंदे सेना ही बाळासाहेबांची नव्हे, तर मोदी-शहांची बी-टीम! ‘उद्धव ठाकरे हे रक्ताचे तर एकनाथ शिंदे हे विचारांचे वारसदार असून भविष्यात दोघे एकत्र येऊ शकतात’, या दाव्यांची हवा काढताना वैभव नाईक यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे रक्त आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांचे व प्रखर हिंदुत्वाचे ज्वलंत विचार हे केवळ उद्धव ठाकरेच समर्थपणे पुढे नेत आहेत. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंचा गट हा बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा नसून तो पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या इशाऱ्यावर चालत आहे. शिंदे सेना ही निव्वळ भाजपची ‘बी-टीम’ बनली आहे. ज्यांचे विचार पूर्णपणे दिल्लीपुढे गहाण पडले आहेत, ते बाळासाहेबांच्या शिवसेनेशी कधीही एकत्र येऊ शकत नाहीत.” उद्धव ठाकरेंच्या काळात ‘ब्र’ काढण्याची हिंमत नव्हती बुलढाण्याचे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकरी आत्महत्येवर केलेल्या असंवेदनशील विधानावर नाईक यांनी संताप व्यक्त केला. “संजय गायकवाड हे शेतकरी आत्महत्यांवर बोलताना ‘आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मौतीला (अंत्यसंस्काराला) जाऊ नका’ अशी विधाने करतात. हे अत्यंत निर्लज्जपणाचे लक्षण आहे. जेव्हा हे आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते, तेव्हा अशा प्रकारे बेताल वक्तव्ये करून ‘ब्र’ काढण्याचीही यांची हिंमत नव्हती.” शिंदे सेनेची शेतकरीविरोधी वृत्ती उघडी “आता एकनाथ शिंदेंचा आपल्या आमदारांवर कोणताही राजकीय व नैतिक धाक राहिलेला नाही. त्यामुळे त्यांचे आमदार बेभान होऊन वाटेल ती शेतकरीविरोधी विधाने करत आहेत. शेतकऱ्यांना जनावर समजणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रातील बळीराजा रस्त्यावर उतरून योग्य तो जाब विचारल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी शेवटी दिला. ——————————————————- हेही वाचा… महायुती टिकवायची असेल तर झारीतले शुक्राचार्य रोखा: भाजपचा शिवसेनेला इशारा; नवनाथ बन म्हणाले-12 पक्ष फिरून आलेल्या धंगेकरांनी फडणवीसांवर बोलू नये! महायुतीविरोधात काम करणारे रवींद्र धंगेकर अब्दुल, सत्तार यांच्यावर कारवाई करा, महायुती टिकवायची असेल तर झारीतले शुक्राचार्य रोखा, असा खणखणीत इशारा भाजपने आज शिवसेनेला दिला. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांचा माकडछाप म्हणून उल्लेख केला. नवनाथ बन यांनी काल भूमिका मांडल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ प्रवीण दरेकरांसह भाजपचे इतर नेते मैदानात उतरले. आज पुन्हा विधान परिषद निवडणूक निकालावरून महायुतीमध्ये जोरदार जुंपली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *