![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आता देश चालवण्याचे सामर्थ्य राहिले नाही. त्यामुळे त्यांनी जनतेला काटकसरीचे सल्ले देण्यापेक्षा स्वतःच सत्तेतून दूर व्हावे, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर निशाणा साधताना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी मंगळवारी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांच्यावर उपरोक्त शब्दांत निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशापुढील आव्हानांवर लोकसभेत आपली भूमिका मांडली. विविध सभांतूनही त्यांनी यावर भाष्य केले. त्यांनी पंतप्रधानांना वेळीच सर्वांना विश्वासात घेण्याचा सल्ला दिला. पण पंतप्रधान मोदी व अमित शहा यांचा वेळ पश्चिम बंगालमध्येच ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यात गेला. यूपीए सरकारने पाकिस्तानला जागतिक पातळीवर एक अतिरेकी देश म्हणून उघडे पाडले. जगाला त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण आज तोच पाकिस्तान जागतिक पातळीवर शांतीदूत म्हणून पुढे आला आहे. नाना पटोले म्हणाले, सद्यस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आता देश चालवण्याचे सामर्थ्य राहिले नाही. ते पूर्णतः फेल झालेत त्यामुळे त्यांनी भारताच्या जनतेला सल्ले देण्यापेक्षा स्वतःच सत्तेतून दूर व्हावे. कारण, त्यांची देशात सत्ता आली तेव्हापासूनच त्यांनी या जनतेला रांगेत उभे करण्याचे काम केले. आता हे सत्ता चालवण्याच्या लायकीचे राहिले नाहीत, ही भूमिका राहुल गांधी यांनी मांडली आहे. त्याचे आम्ही समर्थन करतो. काटकसरीची सुरुवात स्वतःपासून करा नाना पटोले यांनी यावेळी केंद्र व राज्य सरकाकरला काटकसरीची सुरुवात स्वतःपासून सुरू करण्याचाही टोला हाणला. ते म्हणाले, पंतप्रधानांनी एका दिवसात 3 सभा घेतल्या. त्यांच्या सुरक्षेचा विषय आहे. त्यामुळे त्यांच्या ताफ्यावर आपल्याला बोलता येणार नाही. पण सुरक्षेच्या नावाखाली अनेक मुख्यमंत्री, मंत्री, आमदार जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत आहेत. त्यांनी जवळपास सगळा देश जिंकला आहे. सगळे राज्य त्यांनी आपल्या ताब्यात घेतले आहेत. पश्चिम बंगाल जिंकल्यानंतर भाजपने एक नकाशा जाहीर केला. त्यात आपण सगळा भारत जिंकल्याचा आव आणून स्वतःची पाठ थोपटवून घेतली. पण आता त्यांचे केंद्र व राज्यातील नेते कसे वागतात यावर देशाच्या जनतेचे लक्ष आहे. मधु दंडवते मंत्री होते तेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली होती. या व्यवस्थेपासून सुरुवात केली होती. पंडित नेहरूंनीही याची सुरुवात केली होती. त्याहून पलीकडे पाहायचे तर देशात अन्नधान्याचा तुटवडा होता, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी स्वतः उपवास सुरू केला होता. अशा प्रकारची मार्गदर्शक व्यवस्था त्यांनी देशात सुरुवात केली होती. पण भाजप आता असे काही करेल असा कुणालाही विश्वास नाही. भाजप काँग्रेसच्या मार्गाने वाटचाल करत असल्याचे सांगा भाजप हा पक्ष काँग्रेसच्या चुका जनतेपुढे मांडून सत्तेत आला. आता त्यांना 13 वे वर्ष लागले आहे. या 13 वर्षांत त्यांनी देशाची परिस्थिती अशी काही करून ठेवली आहे की, ती लपवण्यासाठी त्यांना जुन्या गोष्टी काढाव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांनी आम्ही सर्वजण काँग्रेसच्याच भूमिकेने चालत आहोत हे सांगावे. इंदिरा गांधींच्या काळात आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता. त्यामुळे त्यांनी हरित व श्वेत क्रांती आणली. आपण त्या काळात अमेरिकेचे मिलो खात होतो. पण इंदिरा गांधींनी त्यावर मात करून देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला. या सगळ्या गोष्टी भाजपने सांगितल्या पाहिजेत, असे नाना पटोले म्हणाले.
Source link