Headlines

पक्षात कोणताही वाद नाही; राष्ट्रवादी एकसंघ असल्याचा दावा:देवगिरीवरील बैठकीनंतर अफवांना ऊत; बनसोडेंचं मोठं स्पष्टीकरण




मुंबईतील देवगिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना मोठं उधाण आलं होतं. मात्र या सर्व चर्चांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे यांनी प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत पक्षात कोणताही वाद नसल्याचा दावा केला आहे. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या बातम्या पूर्णपणे निराधार असून पक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकसंघपणे काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. संजय बनसोडे यांनी म्हटलं की, 26 मे रोजी झालेल्या बैठकीत पक्षाच्या सर्व आजी-माजी खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला. सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील, त्यामागे सर्व नेते आणि पदाधिकारी ठामपणे उभे राहतील, अशी ग्वाही बैठकीत देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पक्ष बळकटीसाठी सर्वजण एकत्रितपणे कार्यरत राहणार असल्याचं बनसोडेंनी सांगितलं. दरम्यान, बैठकीदरम्यान सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर आणि प्रफुल पटेल यांच्यावर सातत्याने होत असलेल्या टीकेबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. पक्षातील कुणीही आमच्या समर्थनासाठी पुढे येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच प्रत्येक वेळी टीकेचे धनी आम्हीच का व्हायचं, यावर वरिष्ठ नेतृत्व भूमिका घेणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केल्याची चर्चा रंगली. विशेष म्हणजे प्रफुल पटेल मुंबईत उपस्थित असूनही बैठकीला गैरहजर राहिल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत सुनील तटकरे बोलत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. मात्र आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आपण बोलणारच असल्याचं तटकरेंनी सांगितल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे, सुनील तटकरेंच्या भाषणापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून बाहेर पडल्याची माहितीही समोर आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद वाढल्याच्या चर्चांना अधिक जोर आला आहे. पक्ष पूर्णपणे एकसंध मात्र या सर्व चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न आता पक्षाकडून केला जात आहे. संजय बनसोडे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही अंतर्गत संघर्ष नाही. पक्ष पूर्णपणे एकसंध असून सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आगामी राजकीय वाटचाल अधिक ताकदीने केली जाणार आहे. तसेच छगन भुजबळ यांनीदेखील सुनील तटकरे आणि आपल्यात कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट करत अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *