![]()
नागपूरच्या धंतोली परिसरातून ११ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परसवानी कुटुंबाचा अखेर शोध लागला आहे. तांत्रिक तपासादरम्यान एका ‘जी-पे’ (G-Pay) व्यवहारातून त्यांचे लोकेशन पिंपरी-चिंचवड येथे ट्रेस झाले. यानंतर नागपूर पोलिसांचे एक विशेष पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झाले आहे. धंतोली येथील बलराज मार्गावरील ‘दुर्गा सदन’ इमारतीत राहणारे जितेंद्र परसवानी, त्यांची पत्नी हर्षा, मुलगी इशिता, खुशी आणि मुलगा कृष्णा हे २४ जूनपासून अचानक गायब झाले होते. त्यांचे सर्व मोबाईल फोन बंद असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. हे कुटुंब अत्यंत सावधगिरी बाळगत होते आणि केवळ ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी काही सेकंदांसाठी इंटरनेट सुरू करत होते. मात्र, पिंपरी-चिंचवड येथे एका व्यवहारासाठी त्यांनी ‘जी-पे’ वापरले. याच डिजिटल पाऊलखुणेमुळे पोलिसांना त्यांचा माग काढण्यात यश आले. पोलिस सूत्रांनुसार, या तपासात कौटुंबिक वाद हे एक मोठे आव्हान होते. जितेंद्र परसवानी यांचे दिवंगत वडील सुरेश परसवानी आणि त्यांचे इतर चार भाऊ याच इमारतीत राहतात. मात्र, त्यांच्यात फारसे संबंध नसल्याने पोलिसांना सुरुवातीला माहिती मिळवण्यात अडचणी आल्या. पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आले की, जितेंद्र परसवानी यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठी ते ‘दुर्गा सदन’मधील आपल्या हिश्याची मालमत्ता विकण्याच्या प्रयत्नात होते. परंतु, मालमत्तेत पाच भावांचे हिस्से असल्याने कायदेशीर गुंतागुंत निर्माण झाली होती. आर्थिक विवंचनेतून सुटण्यासाठीच त्यांनी कुटुंबासह नागपुरातून पलायन केले असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कुटुंब बेपत्ता झाल्याने घातपाताची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, डिजिटल व्यवहारातून ते जिवंत आणि सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्याने धंतोली पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. लवकरच या कुटुंबाला नागपुरात परत आणले जाईल अशी अपेक्षा आहे.
Source link
परसवानी कुटुंब 11 दिवसांपासून बेपत्ता:पिंपरी-चिंचवडमध्ये शेवटचे लोकेशन ट्रेस, जी-पेमुळे छडा लागला