Headlines

पवार कुटुंबात पुन्हा शुभकार्याची तयारी:29 जुलैला पार्थ पवार-कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबाची होणारी सून?




पवार कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा कायनात धार यांच्यासोबत साखरपुडा होणार आहे. येत्या 29 जुलै रोजी पुण्यात हा साखरपुडा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्यात पार्थ पवार यांच्यासोबत कायनात धार उपस्थित होत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह त्यांची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या नात्याबाबत चर्चांना उधाण आले होते. आता त्यांच्या साखरपुड्याची तारीख निश्चित झाल्याने या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे. कोण आहेत कायनात धार? कायनात धार या मूळच्या हरियाणातील असून सध्या त्या दिल्लीत वास्तव्यास आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्या पार्थ पवार यांच्यासोबत विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत होत्या. काही महिन्यांपूर्वी दोघांनी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पवार कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध कायनात धार या केवळ आनंदाच्या प्रसंगातच नव्हे, तर पवार कुटुंबाच्या कठीण काळातही त्यांच्यासोबत दिसल्या. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर त्या बारामतीत कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचल्या होत्या. तसेच मुंबईतील वरळी येथे आयोजित शोकसभा आणि दशक्रिया विधीलाही त्यांनी उपस्थिती लावली होती. याशिवाय रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत त्यांच्या उपस्थितीनेही सर्वांचे लक्ष वेधले होते. पवार कुटुंबाच्या विविध कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग असल्यामुळे त्या चर्चेत राहिल्या. रेवती सुळेंच्या विवाहसोहळ्यात दिग्गजांची उपस्थिती दरम्यान, रेवती सुळे आणि उद्योजक सारंग लखानी यांच्या विवाहसोहळ्याला देशातील राजकीय, उद्योग आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार, जम्मू-काश्मीरचे नेते ओमर अब्दुल्ला, कन्निमोझी, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह अनेक नेते या सोहळ्यात सहभागी झाले होते. बॉलिवूडमधून शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांनी उपस्थिती लावली होती. तसेच उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह अनेक नामवंत उद्योजकांनीही या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. आता रेवती सुळे यांच्या विवाहानंतर अवघ्या काही दिवसांतच पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या साखरपुड्याची तयारी सुरू झाल्याने पवार कुटुंबात पुन्हा एकदा शुभकार्याचे वातावरण निर्माण झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *