Headlines

पहिला श्रावणी सोमवार:सव्वा लाख भाविक घृष्णेश्वराचे घेणार दर्शन; नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट रस्ता अवजड वाहनांसाठी बंद




बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या ऐतिहासिक घृष्णेश्वर महादेव मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त सुमारे सव्वा लाख भाविक हजेरी लावण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने भाविकांच्या सुखकर दर्शनासाठी, गर्दीच्या नियोजनासाठी जय्यत तयारी केली आहे. यंदा गेल्या वर्षीप्रमाणेच भाविकांचे दर्शन एक ते दीड तासात होईल. भाविकांच्या सुरक्षेसाठी २२ अधिकारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि मेडिएटर कंपनीचे ४० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. भाविकांसाठी रांगेत बॅरिकेडिंग करण्यात आले असून पिण्याच्या पाण्यासाठी ‘आरओ वॉटर’ची सोय केली आहे. मंदिर परिसरात स्वयंसेवी संस्थांचे ८ स्टॉल्स उभारण्यात येणार असून त्याद्वारे भाविकांना साबुदाणा खिचडी, केळी आणि सरबताचे मोफत वाटप केले जाईल. हे मार्ग राहतील बंद नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट – हा मार्ग सर्व प्रकारच्या मध्यम व जड/अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहील.
दौलताबाद टी पॉइंट ते दौलताबाद घाट गेट (आयुक्तालय हद्दीपर्यंत) हा मार्ग सर्व प्रकारच्या लहान-मोठ्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. असे असतील पर्यायी मार्ग संभाजीनगरकडून नाशिक-धुळ्याकडे मध्यम व अवजड वाहने ही बाबा पंप – नगर नाका – ए.एस. क्लब – करोडीमार्गे धुळे-सोलापूर हायवेने जांभाळा – वेरूळ या मार्गाने जातील. नाशिक-धुळ्याकडून संभाजीनगरकडे येणारी वाहने ही वेरूळ – कसाबखेडा फाटा – करोडी – ए.एस. क्लब- नगर नाका – बाबा पंप या मार्गाने येतील. नियमित पूजा अन् राजशिष्टाचार श्रावणी सोमवारी मंदिरातील नियमित पूजा व अभिषेक केवळ रवींद्र पुराणिक यांच्या हस्ते होतील. दुपारी २ ते ४ यादरम्यान राजशिष्टाचार (व्हीआयपी) व्यक्तींना दर्शनाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रशासकीय नियोजनाअभावी वेरूळ येथे असंतोष रविवारी घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी ६ तासांची रांग लावावी लागली. लहान मुलांसाठी स्तनपान कक्षाचा अभाव आणि रस्ते बंद केल्याने स्थानिक दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या अव्यवस्थेवर आमदार अंबादास दानवे व स्थानिकांनी संताप व्यक्त केला, तर ट्रस्टने चर्चेतून मार्ग काढण्याची तयारी दर्शवली. अभिषेक बंद; गाभाऱ्यात मिळणार प्रवेश ‘श्रावणी सोमवारी होणारी अफाट गर्दी लक्षात घेता गर्दीचे योग्य व्यवस्थापन व्हावे यासाठी सर्वसामान्यांसाठी अभिषेक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, भाविकांना थेट गाभाऱ्यात जाऊन महादेवाचे दर्शन घेता येईल.’ – कुणाल दांडगे, अध्यक्ष, घृष्णेश्वर मंदिर ट्रस्ट १० हजार चौरस फुटांचा मंडप ‘पावसाळ्याचे दिवस असल्याने दर्शनासाठी रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना पावसात भिजत ताटकळत राहावे लागू नये यासाठी प्रशासनातर्फे पहिल्यांदाच १०० बाय १०० फुटांचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे.’ – योगेश टोपरे (विश्वस्त, घृष्णेश्वर मंदिर ट्रस्ट)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *