![]()
टाकळी जिवरग ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे दिवस उलटत आले तरी पावसाने पाठ फिरवल्यामुळे सिल्लोड तालुक्यातील कायगाव, टाकळी जिवरग, गव्हाली, तलवाडा व बोरगाव कासारी परिसरातील खरीप पिके पूर्णपणे धोक्यात आली आहेत. पिके करपून गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून दुबार पेरणीचा खर्च आणि आर्थिक संकटामुळे बळीराजा मोठ्या चिंतेत सापडला आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी कर्जाची उचल करत व उधारी-उसनवारी करून मका, सोयाबीन, कापूस व बाजरीची पेरणी केली होती. सुरुवातीला पाऊस चांगला झाल्याने पिके जोमात आली, मात्र वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यातच पावसाने दांडी मारल्याने पिके माना टाकू लागली आहेत. कडक उन्हामुळे शेतातील जमिनीला मोठे तडे गेले असून सोयाबीन व मका पिवळे पडून वाळत आहे. परिसरातील नदी, नाले व पाझर तलाव कोरडेठाक पडले आहेत. विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी कमालीची खालावल्यामुळे उरलीसुरली पिके वाचवणेही आता अशक्य झाले आहे. बियाणे, खते आणि मजुरीचा खर्चही निघण्याची शक्यता नसल्याने बँकांचे पीककर्ज कसे फेडायचे, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. प्रशासनाने व कृषी विभागाने या गंभीर परिस्थितीची तत्काळ दखल घेऊन दुष्काळी पाहणी करावी आणि बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करून हेक्टरी भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आर्त हाक परिसरातील हवालदिल शेतकऱ्यांकडून दिली जात आहे. टाकळी जिवरग परिसरातील पीक पावसाअभावी करपत आहे.
Source link
पावसाअभावी टाकळी जिवरगपरिसरात खरीप हंगाम धोक्यात:नदी-नाले, विहिरी कोरड्या; शासनाकडून तातडीने मदतीची मागणी