Headlines

पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटली; जलस्रोतांवर वाढला ताण:नांदगाव तालुक्यात 65 हजार हेक्टरवरील पिके धोक्यात‎




जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर नांदगाव तालुक्यात पुन्हा पावसाने दडी मारल्याने सुमारे ६५ हजार हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात आली आहेत. शेतातील ओलावा झपाट्याने कमी होत असून, मका, बाजरी, सोयाबीन, मूग आणि तूर पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. उशिरा पेरलेले बियाणे कुजू लागल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. जून महिना जवळपास कोरडाच गेल्याने खरीप हंगामाची सुरुवात उशिरा झाली. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या, मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. विशेषतः हलक्या जमिनीतील मका, बाजरी, सोयाबीन आणि इतर पिकांची अवस्था चिंताजनक बनली आहे. पावसाअभावी शेतातील ओलावा कमी होत असल्याने कोवळे अंकुर करपत आहेत. काही ठिकाणी उशिराने पेरलेले पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिके अशी कोमेजू लागत्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बियाणे जमिनीतच कुजू लागल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. लवकर पाऊस न झाल्यास शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, पावसाअभावी गावांतील विहिरी, बोअरवेल आणि शेततळ्यांतील पाणीसाठाही झपाट्याने कमी होऊ लागला आहे. अनेक ठिकाणी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने पंचनामे करून परिस्थितीचा आढावा घ्यावा, तसेच दुबार पेरणीसाठी बियाणे व आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास तालुक्यातील खरीप हंगामासह संभाव्य पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. माणिकपुंज धरणाच्या मृतसाठ्यातून १८ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. तर नाग्या-साक्या धरणात अवघा दोन टक्के जलसाठा शिल्लक असून, तेथून २४ गावांची तहान भागविण्यासाठी टँकर सुरू आहेत. भूजलपातळी खालावल्याने तालुक्यातील ४२ गावे आणि २०० हून अधिक वाड्या-वस्त्यांना सध्या तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास टँकरची संख्या वाढवावी लागू शकते. प्रशासनाने नऊ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. जून महिना जवळपास पूर्णपणे कोरडा गेला. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या अल्प पावसावर पेरणी केली, मात्र त्यानंतर पाऊसच गायब झाला. त्यामुळे मक्याची वाढ खुंटली असून, अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी आहे. आता या पिकावर ट्रॅक्टर फिरवून दुबार पेरणी करण्याची वेळ येऊ शकते.- अशोक सानप, शेतकरी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *