![]()
अहिल्यानगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांवर गेल्या पंधरवड्यापर्यंत सक्रिय असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. शनिवार-रविवारपासून आकाशातील काळेनिळे ढग दूर होऊन निरभ्र आकाश दिसू लागल्याने भंडा
.
यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून ९ ऑगस्टपर्यंत घाटघर येथे सर्वाधिक ३७६० मिमी, रतनवाडीत ३१४१ मिमी, पांजरे येथे २४४३ मिमी, भंडारदरा येथे २१३९ मिमी, तर वाकी जलाशयावर १८३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे भंडारदरा परिसरातील धबधबे प्रवाहित झाले होते. आता पाऊस कमी झाल्याने ते झुळूझुळू वाहू लागले आहेत.
भंडारदरा धरण, आर्थर लेक पॉईंट, रंधा धबधबा, घाटनदेवी, कोकणकडा, पांजरे येथील वैशाली फॉल आणि रिंगरोड परिसरातील धबधबे पाहण्यासाठी शनिवारी-रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी झाली. पार्किंगची व्यवस्था अपुरी पडल्याने अनेकांनी रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली. परिणामी काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. हॉटेल्समध्येही तुफान गर्दी झाल्याने जेवणासाठी पर्यटकांना तासभर प्रतीक्षा करावी लागली. खाद्यपदार्थ व पाण्याच्या बाटल्यांच्या दरवाढीच्या तक्रारीही पर्यटकांनी केल्या.
दरम्यान, धरणसाठ्यांची स्थिती समाधानकारक आहे. भंडारदरा धरण ९७.६२ टक्के, निळवंडे ९८.५४ टक्के, तर आढळा व वाकी धरणे शंभर टक्के भरली आहेत. भंडारदऱ्यातून ८१९ क्युसेक, आढळ्यातून ९८ क्युसेक आणि वाकीतून १९८ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
१५ ऑगस्टच्या सुट्टीत होणार मोठी गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनाने वाहतूक नियंत्रणासाठी एकेरी वाहतुकीचे नियोजन सुरू केले आहे. पुढील काही दिवस पर्यटनासाठी पोषक वातावरण राहण्याची शक्यता स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.