Headlines

पावसाने दडी मारल्याने कडेठाण परिसरातील शेतकरी हवालदिल:विहिरी कोरड्या पडल्या, खरीप पिकांची वाढ खुंटून किडीचा प्रादुर्भाव वाढला‎




पैठण तालुक्यातील कडेठाण व परिसरात पावसाने दीर्घ दडी मारल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी नदी, नाले व तलाव कोरडे ठाक पडले असून विहिरींनीही तळ गाठला आहे. यंदा चांगल्या पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी बँक कर्ज, सावकारी देणे आणि घरातील दागदागिने गहाण ठेवून पेरणी केली होती. मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण अन् कर्जाची परतफेड यांसारखी स्वप्ने त्यांनी बाळगली होती. मात्र, पावसाच्या हुलकावणीने सर्व आशांवर पाणी फिरले आहे. सध्या शेतातील कापूस, सोयाबीन, तूर व बाजरी ही पिके पाण्याच्या अभावामुळे पिवळी पडू लागली आहेत. जमिनीत ओलावा नसल्याने पिकांची वाढ खुंटली असून किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना महागड्या औषध फवारणीचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागत आहे. आभाळात ढग दाटून येतात, पण पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. येत्या ८ दिवसांत मुसळधार पाऊस झाला नाही, तर खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट होईल. विहिरींचे पाणी आटल्याने फळबागा जगवणे हेदेखील शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. शेतीचे अर्थचक्र पूर्णपणे विस्कळीत झाले असून शासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने मदत व मार्गदर्शन करावे, अशी तीव्र मागणी परिसरातून होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *