![]()
हरसूल विभागातील सात शासकीय आश्रमशाळांमधील ४० विद्यार्थ्यांनी आश्रमशाळांच्या परिसरात उपलब्ध होणाऱ्या तब्बल २३ प्रकारच्या रानभाज्या महोत्सवात विक्रीसाठी आणत तब्बल सात हजार रुपयांची उलाढाल केली. विद्यार्थ्यांनी स्वतः रानभाज्यांची ओळख व महत्त्व सांगत ग्राहकांना माहिती दिल्याने महोत्सवाला शनिवारी (दि. २२) बाजाराच्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाशिक आदिवासी विकास विभागाच्या वतीने हरसूल येथील बिरसा मुंडा चौकात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ आदिवासी समाजसेवक भिवा पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी सरपंच काशीनाथ वळवी, डॉ. रघुनाथ भोये, वामन खोसकर, विनायक माळेकर, बहिरू मुलाने यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनिवार बाजारासाठी हरसूल परिसरातून आलेल्या आदिवासी बांधवांनी महोत्सवाला भेट देत विविध रानभाज्यांचा आस्वाद घेतला. एकाच ठिकाणी अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध झाल्याने नागरिकांनी खरेदीलाही पसंती दिली. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शासकीय आश्रमशाळा ठाणापाडा, शिरजगाव, मुरंबी, बोरीपाडा, देवडोंगरा, रायते, चोळमुक येथील मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या रानभाजींनी वाढवला सुगंध आंबटघोळ, रताळीपाला, आळिंब, तेर, वागट, खुरसानी, कुरडू, सरबल, माठ, दोडे, वास्त, माट भाजी, शेवगा पाला, रानतेरा, तांदूळका, कर्टल, वाघाटा, अंबाडी, खुरासणी, कुळद, भोकरा, उडदाची डाळ आणि नाचणी भाकरी अशा विविध रानभाज्यांनी महोत्सवाची रंगत वाढवली.
Source link
रानभाज्यांच्या विक्रीतून 7 हजार रुपयांची कमाई:हरसूलला 40 विद्यार्थ्यांनी भरवला रानभाजी महोत्सव