![]()
श्रावण महिन्यातील दुसऱ्या शनिवारी खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपासून ते शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत ३० तासांत पाच लाख भाविकांनी दर्शन घेतले. पहिल्या शनिवारी चार लाख भाविकांनी दर्शन घेतले होते; परंतु दुसऱ्या शनिवारी भाविकांच्या संख्येत एक लाखांची वाढ झाली आहे. या गर्दीमुळे खुलताबाद नगरीला यात्रेचे स्वरूप आ ल्याचे संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ व जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी सांगितले. शुक्रवारी रात्रीपासूनच भाविकांचे जत्थे खुलताबादमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली होती. शनिवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पहाटे ४ वाजता श्री भद्रा मारुतीच्या निद्रिस्त मूर्तीचा विधिवत महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी ५.३० वाजता संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महापूजा आणि महाआरती पार पडली. याप्रसंगी बाळू खाडे, माणिक शिंदे आणि सहकाऱ्यांच्या वतीने पुष्प सजावट केली. फुलांनी सजवलेल्या मूर्तीचे रूप डोळ्यांत साठवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार नारायण कुचे, योगेश अवचट, राम मोदाळे, रमेश करपे यांनीही दर्शन घेतले. लासूर स्टेशन | गवळीशिवरा येथील महारुद्र मारुतीच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यातील दुसऱ्या शनिवारी दीड लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली. पहाटेपासूनच सुरू झालेली ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती. भाविकांसाठी महाप्रसादाच्या भंडाऱ्याचे आयोजन केले होते. यजमानपद अंकुश केरे, अरुण केरे, संतोष केरे, रावसाहेब मातडे, जीवन कात्रे, शिवाजी बोराडे, बाळू नरोडे, अमित काला आणि गंगाधर पंडित या अन्नदात्यांनी भूषवले. वैरागड, फुलशिवरा येथून पायी दिंड्या दाखल झाल्या असून अनेक भाविकांनी नवसही फेडले. मंदिर प्रशासनाने बॅरिकेड्स, दर्शन रांग, पिण्याचे पाणी व सीसीटीव्हीची चोख व्यवस्था केली होती. पहिल्या शनिवारच्या तुलनेत भाविकांची संख्या दुपटीने वाढली आहे. श्रावणी शनिवारनिमित्त भद्रा मारुतीची आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली. जरबेरा, गुलाब, मोगरा आदी १०१ किलो फुलांचा वापर करून ही सजावट करण्यात आली. फुलांनी सजवलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची विशेष गर्दी झाली. भाविकांच्या सेवेसाठी भद्रा मारुती मित्रमंडळाच्या वतीने मंदिराच्या मागील बाजूस भोजन शेडमध्ये हजारो भाविकांना ११ क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. भाविकांना प्रसाद मिळावा यासाठी कार्यकर्त्यांनी दिवसभर परिश्रम घेतले. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर संस्थान व प्रशासनाच्या वतीने दर्शनाचे नियोजन केले. पुरुषांसाठी दोन रांगा, तर महिलांसाठी स्वतंत्र दर्शन रांग ठेवण्यात आली. गर्दी नियंत्रणासाठी पोलिस व प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या. गर्दीचा फायदा स्थानिक बाजारपेठेलाही झाला. हॉटेल, फुलहार, नारळ, पूजा साहित्य, प्रसाद तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे दिवसभर मोठी गर्दी होती. फुलविक्रेते, पूजा साहित्य विक्रेते, हातगाडीधारक यांनी चांगला व्यवसाय मिळाल्याचे यावेळी सांगितले.
Source link
दुसरा श्रावणी शनिवार:भद्रा मारुतीचे 5 लाख भाविकांनी घेतले दर्शन, खुलताबादला दर्शनास 1 तास, पहिल्या शनिवारपेक्षा एक लाख भाविक वाढले