![]()
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन आणि कायद्याच्या अंमलबजावणीत कसूर केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. ही माहिती अधिवक्ता सत्या मुळे यांनी दिली. याचिकेत म्हटले आहे की, ध्वनी प्रदूषण नियंत्रणासंदर्भात न्यायालयीन आदेश आणि कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे ध्वनी प्रदूषणाचे नियम वारंवार मोडले जात असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकेत गणेशोत्सव, दहीहंडी, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांसह विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजातील ध्वनिवर्धक आणि डीजे यंत्रणांचा वापर होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात प्रशासनाने जाणीवपूर्वक कसूर केल्याचा आरोपही याचिकेत आहे. ध्वनी प्रदूषण केवळ उत्सवांपुरते मर्यादित नाही, तर बार, पब, क्लब आणि रेस्टॉरंटमधूनही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे याचिकेत नमूद केले आहे. यामुळे निवासी भागातील नागरिकांच्या शांततेने राहण्याच्या अधिकारावर परिणाम होत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. अधिवक्ता सत्या मुळे यांनी स्पष्ट केले की, याचिकाकर्ते कोणत्याही उत्सवाच्या विरोधात नाहीत. मात्र, कायद्याने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या आधुनिक ध्वनियंत्रणा आणि अॅम्प्लिफायरच्या वापराला त्यांचा विरोध आहे. ध्वनी प्रदूषणाविरोधातील कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे हे पोलिसांचे कर्तव्य असून, प्रशासनाची निष्क्रियता न्यायालयीन अवमानाच्या स्वरूपाची ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
Source link
पुणे पोलिस आयुक्तांविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका:ध्वनी प्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीतील निष्क्रियतेमुळे दाखल